‘विमान अपघाताची’ तातडीने चौकशी करा; अजितदादांना न्याय मिळवून द्या, राष्ट्रवादीने भाजपचा अजेंडा राबवू नये : काँग्रेस

By: Editor_Pratik

On: Wednesday, August 5, 2026 6:34 PM

Google News
Follow Us

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप; गोपाळदादा तिवारी यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

पुणे, दि. ५ ऑगस्ट : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणाच्याही दबावाखाली न राहता राजधर्माचे पालन करावे, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचा राजकीय अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

तिवारी म्हणाले की, सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांना “गुंगी गुडिया” म्हटले नसून, “गुंगी गुडिया बनू नये” असे म्हटले होते. या दोन विधानांतील स्पष्ट फरक दुर्लक्षित करून काँग्रेसवर टीका केली जात आहे.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करण्याची गरज काय होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुनेत्रा पवार यांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत स्वतः भूमिका मांडणे अपेक्षित होते, असेही त्यांनी सांगितले.

तिवारी यांनी अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी तातडीने करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून न्याय मिळवून देण्यासाठीही सरकारने प्रभावी कारवाई करावी, असे ते म्हणाले.

आमदार रोहित पवार यांनी या चौकशीसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरकारने स्पष्ट उत्तरे द्यावीत आणि कोणताही निष्कर्ष न काढता सत्य जनतेसमोर आणावे, अशीही काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात काँग्रेसचे मोठे योगदान राहिल्याचा उल्लेख करत, काँग्रेसने पवार कुटुंबाला नेहमीच सन्मान आणि संधी दिली असल्याचे तिवारी म्हणाले. उलट भाजपने पूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मात्र त्यावर मौन बाळगणारे नेते आज काँग्रेसवर आक्रमक होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची उपशाखा बनून काँग्रेसविरोधी राजकारण करण्याऐवजी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी आपली राजकीय ताकद वापरावी, असे आवाहन गोपाळदादा तिवारी यांनी केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 5, 2026

August 4, 2026

August 4, 2026

August 4, 2026

August 3, 2026

August 3, 2026