विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासत तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करावेत

By: Editor_Manas

On: Wednesday, June 17, 2026 3:12 PM

Google News
Follow Us

पुणे: “मानवी भवताल वेगाने बदलत असून, तंत्रज्ञानातील बदलांची गती सर्वाधिक आहे. आपल्याला २०४७ पर्यंत विकसित श्रेणीत पोहोचण्यासाठी युवा पिढीला नव्या काळानुरूप स्वतःमध्ये आणि भवतालामध्ये अनुरूप परिवर्तन घडवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तरुणांनी संशोधक वृत्ती जोपासत झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान अवगत करावे,” असे प्रतिपादन  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) रायपूरचे माजी कुलगुरू व संचालक डॉ. पी. के. सिन्हा यांनी केले. भारत विश्वगुरू होण्यासाठी शिक्षण व्यवस्थेतही पूरक बदल आवश्यक असून, त्यासाठी ‘इग्नाईट २०२६’ यांसारख्या तांत्रिक परिषदांमधून पाठबळ मिळेल, असेही ते म्हणाले.

येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित केजे कॉलेज ऑ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चतर्फे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (आयईईई) पुणे विभाग, यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित इनोव्हेशन अँड ग्रोथ इन नेक्स्ट-जन इंटेलिजंट टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग (इग्नाईट) २०२६ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डाॅ. सिन्हा बोलत होते. नगर रस्त्यावरील हॉटेल हयात येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव होते. प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डीकोस्टा, डॉ. बी. बी. अहुजा, केजे शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला (निवृत्त), तांत्रिक संचालक डॉ. अजय फुलंबरकर, प्राचार्य डॉ. सुहास खोत, ‘इग्नाईट’च्या चेअरपर्सन डॉ. निकिता कुलकर्णी, ‘आयईईई’चे पुणे विभागाचे सचिव डाॅ. अभिजीत खुरपे, प्रतिनिधी प्रा. रहिमराजा शेख आदी उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

डॉ. पी. के. सिन्हा पुढे म्हणाले, “युवापिढी ही आपल्या देशाची ताकद आहे. आपली कोणतीही कृती वैयक्तिक संदर्भांच्या पलीकडे जाऊन परिणाम करू शकते, याचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने कृतीशील होणे गरजेचे आहे. या आव्हानात्मक काळात चांगली पिढी घडविण्याचे दायित्व शिक्षकांवर आहे. प्रत्येक क्षेत्रात नवकल्पना आणि वेगळेपण अपेक्षित आहे. स्वतःमध्ये बदल घडवणे, ही प्राथमिकता आहे. अभ्यासक्रम आणि उद्योगविश्व, यातील अंतर कमी करण्यासाठी संशोधकवृत्ती जोपासली गेली पाहिजे. प्रत्येक तंत्रबदलानुसार यंत्रणा बदलतात, तशा नव्या संधी, संशोधनाची नवी क्षेत्रेही खुली होतात. उद्योगविश्वात बदल घडतात. हे बदल स्वीकारण्याची मानसिकता अशा परिषदांमधून घडते.”

डाॅ. पराग काळकर म्हणाले, “सध्या विद्यार्थी नैसर्गिक बुद्धीमत्तेऐवजी कृत्रिम बुद्धीमत्तायुक्त होत आहेत. पदवीच्या सोबतीने विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. पारंपरिक मानसिकता बदलून बहुविद्याशाखीय कौशल्ये मिळविण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. पदवीकाळात एक वर्षाचा कार्यानुभव अनिवार्य केला पाहिजे. जागतिक स्पर्धेत दखलपात्र होण्यासाठी आपली वाटचाल गतिमान, तंत्रस्नेही, कौशल्यांना प्रोत्साहन देणारी आणि मूल्य-निष्ठांच्या पायावर उभी राहणारी असली पाहिजे. वर्गाबाहेरचे शिक्षण, ज्ञानसंपादन, संशोधनपूरक वातावरण आणि पायाभूत सुविधा यांच्या जोडीने आपले शिक्षकही काही बाबतीत विद्यार्थीवृत्तीचे असणे गरजेचे आहे.”

डाॅ. हॅरॉल्ड डिकोस्टा यांनी आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या, सर्वाधिक नेट यूजर्स आणि जोडीने सर्वाधिक सायबर क्राईम घडणारा देश असल्याचे नमूद केले. वापरकर्ते सर्वाधिक पण त्याचे सर्व मूळ निर्माते मात्र विदेशी, हा विरोधाभास तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात वावरणार्या युवा पिढीसाठी आव्हानात्मक आहे. नव्या पिढीला ही आव्हाने पेलण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी आपल्या शिक्षण व्यवस्थेची आहे.

कल्याण जाधव म्हणाले, “कोणतीही अडचण, समस्या ही संधी मानून, त्यावर मार्ग शोधण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, ही प्राथमिकता आहे. उर्जा, इंधन, वाहतूक, पाणीपुरवठा, प्रदूषण अशा व्यापक नागरी समस्यांमध्ये संशोधनाला, नवकल्पनांना मोठा वाव आहे. या नव्या काळाच्या समस्या ओळखून तरुणांनी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. आपले संशोधन समाजोपयोगी कसे ठरेल, याचाही विचार केला पाहिजे.”

हर्षदा जाधव म्हणाल्या, “नव्या ज्ञानप्रणालीचा अंगिकार, तंत्रस्नेहाचा पुरस्कार यातून शैक्षणिक संस्था आणि उद्योगविश्व यांच्यात सेतू उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ डिजिटल, रोबोटिक्स आणि एआयपुरते हे उपक्रम मर्यादित नाहीत तर यातून नवे संशोधक, नव्या संकल्पनांचे निर्माते घडावेत, हा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या प्रगतीसोबत राष्ट्रप्रेम तसेच मानवी जीवनाविषयीची आस्था वाढावी, हॅपीनेस इंडेक्स वाढावा, असाही प्रयत्न आहे.

डाॅ. सुहास खोत यांनी परिषदेमध्ये देश-विदेशातून आलेल्या १,५४८ संशोधन प्रबंधांतून ३५४ प्रबंध सादरीकरण आणि प्रकाशनासाठी निवडले गेले आहेत. स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील संशोधकांचाही या परिषदेत सहभाग आहे. संशोधन, नवकल्पनांचे आदानप्रदान आणि एकूणच मानवी जगण्याची पातळी उंचावण्यासाठी वैचारिक देवाणघेवाण, या परिषदेच्या निमित्ताने होईल, असे सांगितले.

डॉ. अजय फुलंबरकर यांनी बदलते तंत्रज्ञान, नागरी समस्या आणि त्या सोडविण्यात युवकांचा सहभाग याचे महत्व विशद केले. अभिजीत खुरपे यांनी ‘आईईई’च्या उपक्रमांविषयी सांगितले. परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निकिता कुलकर्णी यांनी तीन दिवसांच्या या परिषदेचा आढावा घेतला. डाॅ. नेहा शहारे, डाॅ. अमृता ताकवले. प्रा. पूर्वा कदम, तसेच अमर पीरजादे व वैष्णवी सिंह यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रहीमराजा शेख यांनी आभार मानले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026