प्रतिनिधी – मानस, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा काँग्रेसमध्ये विलय होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. भाजपविरोधात देशपातळीवर व्यापक धर्मनिरपेक्ष आघाडी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणांबाबत नव्या घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीला बोलावून घेतल्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच शरद पवार यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही. सध्या देशातील राजकीय आणि संविधानिक परिस्थिती पाहता धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन थांबवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.”
पटोले यांनी पुढे सांगितले की, भाजपला रोखण्यासाठी देशभरातील धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना एकत्र आणण्याबाबत काँग्रेस नेतृत्व स्तरावर चर्चा सुरू आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्याकडून यासंदर्भात विचारमंथन सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना वेग
काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमधून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये एकत्र आले पाहिजेत, असे मत व्यक्त केले होते. भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचवले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची सावध भूमिका
दरम्यान, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारचा कोणताही अधिकृत प्रस्ताव काँग्रेसकडून आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे सांगितले.
आमदार रोहित पवार यांनीही याच भूमिकेची पुनरावृत्ती करत, पक्षाच्या भविष्यासंदर्भातील कोणताही निर्णय शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली घेतला जाईल, असे म्हटले आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष दिल्लीकडे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी दिल्लीतील बैठका आणि नेत्यांच्या वक्तव्यांमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावर कोणते राजकीय निर्णय घेतले जातात, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.





