पुणे, मे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धन व विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप रायगड बचाव समितीने केला आहे. गेल्या नऊ वर्षांत शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला, तरी गडावर अपेक्षित दर्जाची कामे झालेली नसल्याचा दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
रायगड बचाव समितीच्या वतीने सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज लौकिक गोळे आणि अॅड. अर्चना मारणे यांनी रायगड विकास प्राधिकरण तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली. या मागणीसाठी नुकतेच ‘रायगड वाचवा’ अभियानांतर्गत पुण्यात दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, गडावरील अनेक कामांमध्ये निकृष्ट दर्जा, निधीचा अपव्यय आणि प्रशासनाची निष्काळजी भूमिका स्पष्टपणे दिसून येते. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेली स्वच्छतागृहे वर्षानुवर्षे बंद अवस्थेत असून, पिण्याच्या पाण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणाही अल्पावधीतच निकामी झाली आहे. गडावरील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचा आरोप करण्यात आला.

टकमक टोकासह अनेक धोकादायक ठिकाणी सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली लोखंडी संरक्षक जाळी गंजलेल्या अवस्थेत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या काही बांधकामांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित करण्यात आली. ऐतिहासिक वास्तू, प्राचीन अवशेष आणि शिवकालीन वारसा जतन करण्याऐवजी त्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप समितीने केला.
याशिवाय गड परिसरात दारूच्या बाटल्या आढळून येत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या गाढवांवर अमानुष अत्याचार झाल्याचाही आरोप करण्यात आला. काही जनावरांचा मृत्यू झाल्याने परिसरात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचे समितीचे म्हणणे आहे.
रायगड बचाव समितीने रायगड विकास प्राधिकरण बरखास्त करणे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, निकृष्ट कामांची चौकशी करणे, स्वतंत्र तपासणी व्यवस्था सुरू करणे, महिलांसाठी सुविधा उपलब्ध करणे, सुरक्षा उपाययोजना मजबूत करणे तसेच रायगड परिसरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासह विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
समितीने संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.





