पुणे, ११ मार्च २०२४ : प्रतिष्ठेची १४वी हॉकी इंडिया वरिष्ठ (सीनियर) महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा १३ मार्चपासून नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम खेळली जाणार आहे. या स्पर्धेत गतविजेता हॉकी मध्य प्रदेशसह उपविजेता आणि यजमान महाराष्ट्रासह देशभरातील २८ राज्यांचे सहभागी होतील.
११ दिवस रंगणारी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा साखळी आणि बाद फेरी पद्धतीने (लीग-कम-नॉकआउट फॉरमॅट) खेळली जाणार आहे. सहभागी संघांना आठ गटांमध्ये विभागण्यात आले असून राऊंड-रॉबिन पद्धतीने प्रत्येक संघ एकमेकांशी झुंजतील. प्रत्येक गटातील अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल. उपांत्यपूर्व फेरी २० मार्चपासून रंगेल. त्यानंतर २२ मार्च रोजी उपांत्य फेरी आणि रविवार, २३ मार्च रोजी महाअंतिम फेरी होईल.
हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि फोर्स वन, महाराष्ट्रचे एडीजी कृष्ण प्रकाश (आयपीएस) यांनी वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना आयोजनासाठी मैदानावर आणि मैदानाबाहेर होत असलेल्या एकत्रित प्रयत्नांबद्दल आनंद व्यक्त केला. सहभागी खेळाडूंना फोर-स्टार निवासस्थानांसह सर्वतोपरी सोयीसुविधा पुरवून हॉकी इंडियाच्या स्पर्धांतील आयोजनाचा एक अनोखा पायंडा पाडला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कृष्ण प्रकाश यांनी क्रीडा व युवक कार्य संचालनालय, महाराष्ट्र आणि सह-यजमान पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांनाही धन्यवाद दिले.
हॉकी महाराष्ट्रचे संघटन सचिव आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी क्रीडा व युवक कार्य संचालनालय, महाराष्ट्र आणि सहयजमान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. पुनित बालन ग्रुप, युनियन बँक ऑफ इंडिया, एमक्योर, द ऑर्किड हॉटेल (आतिथ्य भागीदार) आणि डी.वाय. पाटील (वैद्यकीय भागीदार) या प्रायोजकांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. या सर्वांचे पाठबळ स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मोलाचे ठरणार आहे.
हॉकी महाराष्ट्रचे संयोजक आणि सरचिटणीस मनीष आनंद यांनी स्पर्धात्मक स्पर्धेच्या अपेक्षेने संघांच्या प्रभावी लाइनअपवर प्रकाश टाकला.
पहिल्या दिवशी सहा सामने होणार असून सकाळी ७ वाजता सामन्यांना सुरुवात होईल. सायंकाळचा सामना उद्घाटन सह-यजमान , यजमान हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी केरळ यांच्यात फ्लडलाइट्सखाली खेळवला जाईल.