गॅस सिलेंडरसाठी धायरीत लागल्या मोठ्या रांगा; शासनाने नियोजन करायला पाहिजे होते म्हणत नागरिकांनी व्यक्त केली खंत

By: Editor_Pratik

On: Friday, March 13, 2026 8:18 AM

Google News
Follow Us

धायरी (पुणे) – इराण व अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सामान्य नागरिकांवरही होत असल्याचे चित्र दिसत आहे. गॅस सिलेंडरच्या उशिरा होणाऱ्या पुरवठ्यामुळे धायरी व परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

धायरी परिसरातील अनेक नागरिकांनी सांगितले की, गॅस बुक केल्यानंतर सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल दहा-दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला असून, “घरात स्वयंपाक करायचा कसा आणि खायचे काय?” असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

सकाळी सहा वाजल्यापासूनच गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. एवढ्या मोठ्या देशातही जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांनी केंद्र सरकारच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन आधीच योग्य नियोजन व उपाययोजना केल्या असत्या, तर नागरिकांना असा त्रास सहन करावा लागला नसता, असे मतही काही नागरिकांनी व्यक्त केले.

नागरिकांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “दहा-दहा दिवस गॅस मिळत नाही, घरात लहान मुले व वृद्ध आहेत. अशा परिस्थितीत स्वयंपाक कसा करायचा?” तर काहींनी, “सकाळपासून रांगेत उभे राहावे लागते. आम्ही नेमके कोणत्या व्यवस्थेत राहतो आहोत?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कुठेही गॅस टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्षात धायरी व परिसरातील नागरिकांना उशिरा गॅस मिळत असल्याने असंतोष वाढताना दिसत आहे.
याबाबत विविध गॅस एजन्सींशी संपर्क साधला असता, उपलब्ध पुरवठ्यानुसार गॅस वितरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या धोरणानुसारच गॅस सिलेंडर उपलब्ध होत असून, पुरवठा मिळताच ग्राहकांना वितरित केला जात असल्याची माहिती एजन्सीकडून देण्यात आली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now