T20 World Cup 2026 : भारतीय पुरुष क्रिकेट संघ २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup 2026) अंतिम फेरीत पोहचला आहे. ५ मार्च २०२६ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव करून ही कामगिरी केली. भारताची गाठ आता न्यूझीलंडशी पडणार आहे. न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, ८ मार्च २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
तत्पूर्वी, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून २५३ धावा केल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघासाठी संजू सॅमसनने ‘वन मॅन शो’ सादर केला. त्याने केवळ ४२ चेंडूंत ८ चौकार आणि ७ गगनभेदी षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ८९ धावा कुटल्या.
याव्यतिरिक्त शिवम दुबेने २५ चेंडूत ४३, इशान किशनने १८ चेंडूत ३९, हार्दिक पंड्यानं १२ चेंडूत २७ तर तिलक वर्मानं ७ चेंडूत २१ धावा केल्या. अभिषेक शर्मा ९ तर कर्णधार सूर्यकुमार केवळ ११ धावा काढून माघारी परतले. या सामन्यात इंग्लंडकडून आदिल रशीद आणि विल जॅकने प्रत्येकी दोन बळी घेतले तर जोफ्रा आर्चरने एक यश मिळवले.
संजूची वादळी खेळी…
टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत संजू सॅमसनने आपल्या स्फोटक फलंदाजीने वानखेडे स्टेडियमवर अक्षरशः वादळ आणले. त्याने केवळ २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
सलामीला आलेल्या संजूने ४२ चेंडूत ८९ धावा ठोकल्या, ज्यात ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याने पॉवरप्लेमध्येच आक्रमक सुरुवात करून भारताला भक्कम स्थितीत नेले. याआधीच्या सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध ९७ धावांची मॅचविनिंग खेळी केल्यानंतर, संजूचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले.









