Maharashtra Political Update : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून विविध पक्षांमध्ये पक्षांतर, आंदोलनांचे इशारे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपात मोठ्या प्रमाणावर प्रवेश, मराठा आंदोलनाचा इशारा, डीजीसीएवरील प्रश्नचिन्ह, मालेगावातील वादग्रस्त घटना आणि शिंदे गटातील इनकमिंग अशा पाच महत्त्वाच्या घडामोडींनी राज्याचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
भाजपात लवकरच ४ हजार जणांचा प्रवेश
हिंगोली जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिष दांडेगावकर यांनी आपल्या सुमारे चार हजार समर्थकांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी हिंगोलीत त्यांनी शक्तीप्रदर्शन करत मोठा ताफा घेऊन मुंबईकडे प्रस्थान केले. मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाचा अधिकृत सोहळा होणार असल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा इशारा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने महायुती सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरणाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचा आरोप करत त्यांनी जूनपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर कठोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. गरज भासल्यास मराठा समाज मुंबईत मोठा मोर्चा काढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमोल मिटकरी यांचा डीजीसीएला इशारा
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) संबंधित कंपनीची चार विमाने ग्राऊंड केल्याच्या निर्णयावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघातानंतरच त्रुटी का लक्षात आल्या? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
मालेगाव महापालिकेतील नमाज प्रकरणाने वाद
मालेगाव महानगरपालिकेच्या वीज विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी या घटनेवर आक्षेप घेत मुख्यमंत्रीांकडे कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे मालेगावच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे.
शिंदे गटात ‘इनकमिंग’ला वेग
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर शिंदे गटात विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू झाला आहे. नांदेड, अहिल्यानगरसह विविध भागांतील काँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड आणि मनसेशी संबंधित कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत करत संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राज्यातील या घडामोडींमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पक्षांतर, आंदोलन आणि स्थानिक स्तरावरील वादामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापू लागले आहे.








