Delhi Blast Updates : मृतदेहाचे तुकडे विखुरले; रक्तमांसाचा चिखल झाला; लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; दहशतवादी हल्ल्याचा संशय

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याचा सदैव गजबजलेला परिसर सोमवारी सायंकाळी एका कारमध्ये झालेल्या स्फोटाने (Delhi Blast Updates) हादरून गेला. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या सिग्नलजवळ झालेल्या घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरमधील मोहिमेतून घातपाताचा मोठा कट उधळून लावल्याचा दावा तीन राज्यांचे पोलीस करत असताना झालेला हा स्फोट दहशतवादी कृत्य आहे की नाही, याबाबत केंद्र सरकार किंवा तपास यंत्रणांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, १४ वर्षांनंतर दिल्लीत घडलेल्या स्फोटाच्या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांत या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) तपासाचे आदेश दिले. एनआयएसह, न्यायवैद्याक प्रयोगशाळा, ‘एनएसजी’, उत्तर प्रदेश ‘एटीएस’ अशा विविध यंत्रणांनी घटनास्थळी तपासकार्य सुरू केले आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६.५२च्या सुमारास ‘ह्युदाइ आय ट्वेंटी’ कारमध्ये हा स्फोट झाला. त्यावेळी कारमध्ये तीनजण बसले होते आणि कार संथपणे सरकत होती. कारमधील स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी, मृत किंवा जखमींपैकी कुणाच्याही शरीरा छर्रे किंवा तत्सम तीक्ष्ण वस्तू शिरल्याचे आढळले नाही. बॉम्बस्फोटानंतर घटनास्थळ मोठा खड्डा पडतो. तसेही याठिकाणी घडलेले नाही. त्यामुळे बॉम्बस्फोटाबद्दल पोलिसांनी साशंकता व्यक्त केली. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, संबंधित कारची नोंदणी नावावर असलेल्या व्यक्तीस हरयाणातून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांचा आकडा वाढणार?

दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोन-तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.

महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा, सुरक्षेत वाढ

दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अप्रिय घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस- प्रमुख आणि शहरांचे पोलीस आयुक्त यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पंतप्रधानांकडून आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत बळी गेलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून केली. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय काय घटना घडल्या?

१) मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आलली. हरियाणातल्या फरिदाबाद या ठिकाणी पोलिसांनी ३६० किलो अमोनियम नायट्रेट हे स्फोटक पकडलं. तसंच २५०० किलो स्फोटकांसाठी लागणारी रसायनंही पोलिसांनी जप्त केली आहे. तसंच एक रायफल, तीन मॅगझिन, ८३ जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली.

२) डॉक्टरसह संशयितांना अटक करण्यात आली. अल फतेह विद्यापीठातील डॉक्टर आणि काही संशयितांना पोलिसांनी अटक केली. मुझम्मील शकील असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. तर आदिल अहमद नावाच्या डॉक्टरलाही पोलिसांनी अटक केली. इश्तियाक नावाच्या एका इमामलाही पोलिसांनी अटक केली.

जैश ए मोहम्मद, अन्सार गझवा अल हिंद या संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनांचाच हात फरिदाबादच्या प्रकरणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिल्लीवर हल्ला करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावले अशी माहितीही समोर आली होती. तरीही दिल्लीत एक स्फोट झाला आहे.

४) पाकिस्तानशी संबंधित हँडलर्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच आणखी शस्त्रं, स्फोटकं आढळून येतात का? यासंदर्भातही पोलिसांचा तपास सुरु आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला, असे वृत्त सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने दिले. दरम्यान अमित शाहांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना या स्फोटाबद्दल माहिती दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “सुभाष मार्ग ट्राफिक सिग्नलवर आय २० ह्युंदाई गाडीत एक स्फोट झाला आहे. स्फोटामुळे जवळपासच्या गाड्या आणि रस्त्यावरून जाणारे लोक जखमी झाल्याची महिती आहे. प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच १० मिनिटांत दिल्ली गुन्हे शाखा, दिल्ली स्पेशल ब्रांचची पथके घटनास्थळावर पोहचली आहेत. एनएसजी आणि एनआयएच्या पथकाने एफएसएलबरोबर सखोल चौकशी सुरू केली आहे”, असं अमित शाह यांनी सांगितलं.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी काय म्हटलं?

“लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची बातमी अत्यंत चिंताजनक आहे. काही लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं वृत्त आहे आणि हे अत्यंत दुःखद आहे. हा स्फोट कसा झाला आणि त्यामागे काही मोठं षड्यंत्र आहे का? याची चौकशी पोलीस आणि सरकारने तातडीने करावी. दिल्लीच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा सहन केला जाऊ शकत नाही”, असं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले की, “आज दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसंच, जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.”

दरम्यान पुढे शरद पवारांनी घडलेल्या घटनेबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. जुन्या दिल्लीतील अत्यंत गर्दीच्या ठिकाणी ही स्फोटाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही घटना चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले “लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे. माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी. त्यायोगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.”

देशभरात हायअलर्ट; महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सुरक्षा कडक

दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश हरियाणा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले असून, अनेक राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, केरळ या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्येही सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देशातील प्रमुख राज्यांनी तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके, बाजारपेठा आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे.

उत्तर प्रदेशातील अशोक यांचा मृत्यू

दिल्ली स्फोटात उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील हसनपूरचे रहिवासी अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. देवरिया येथील रहिवासी शिवा जैस्वाल, आग्रा येथील पप्पू आणि गाझियाबाद येथील मोहम्मद दाऊद हेदेखील जखमी झाले.

‘त्या’ कारमुळेच उलगडणार स्फोटाचे गूढ

राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटाला कारणीभूत ठरलेली ह्युंदाईची आय-20 ही कार हरियाणात नोंदणी झाली असून, तिचा क्रमांक एच.आर. 26 – 7674 असा आहे. ही कार नदीम खानच्या नावावर असून, तिचा मूळ मालक सलमान होता. सलमानने ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती, असे पोलिसांनी सांगितले. आता यासंदर्भात आणखी चौकशीसाठी सुरक्षा यंत्रणांची पथके हरियाणाला रवाना झाली आहेत.कारण, या कारच्या मालकाचा छडा लागल्यानंतरच या स्फोटामागील गूढ उलगडणार आहे.

सिग्नलवर गाडी थांबली, ड्रायव्हर उतरला अन् भीषण स्फोट झाला!

राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. हळुवार येऊन सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी सुमारे 6 वाजून 52 मिनिटांनी कमी वेगानेे चाललेली गाडी रेड सिग्नलवर थांबली, त्यातून ड्रायव्हर खाली उतरला अन् त्याचवेळी गाडीत शक्तिशाली स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूला उभ्या असलेल्या इतर गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

मृतदेहाचे तुकडे विखुरले; रक्तमांसाचा चिखल झाला!

घटनास्थळी एका मृतदेहाचे तुकडे इतस्ततः विखुरले; रक्तमांसाचा चिखल झाला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एक स्थानिक दुकानदार म्हणाले की, मी माझ्या दुकानात खुर्चीवर बसलो होतो. अचानक जोरात आवाज आला. हा आवाज इतका प्रचंड होता की, मी बसल्या जागेवरून खाली पडलो. त्यानंतर स्वतःला कसाबसा सावरून भीतीने लांब पळालो. माझ्यासह अवतीभोवतीचे लोकही पळू लागले. अन्य एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, मी टेरेसवर होतो. अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणात मोठी आग बघितली. स्फोट इतका भीषण होता की, आमच्या घराच्या अनेक काचा फुटल्या.

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला आहे. अन्य सुरक्षा यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाल्या. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, स्फोट कारमध्ये झाला. मात्र, त्याचे स्वरूप समजले नव्हते. लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.