पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; झोपडपट्टीतील नागरिकांना मिळणार स्वतःचे हक्काचे घर

By: Editor_Pratik

On: Monday, September 29, 2025 11:08 AM

Google News
Follow Us

पिंपरी-चिंचवडमधील नेहरूनगर प्रभाग क्रमांक 9 हा झोपडपट्ट्यांसाठी ओळखला जात होता. अनेक वर्षांपासून येथील कुटुंबे अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरणात राहात होती. मात्र राज्य शासनाच्या स्लम रिहॅबिलिटेशन अॅथॉरिटी (SRA) योजनेमुळे या भागाचे स्वरूप आता बदलत आहे.

या प्रकल्पाअंतर्गत एकूण 2777 झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी 1249 कुटुंबांना नवी घरे मिळाली असून उर्वरित 1528 कुटुंबांचे पुनर्वसन सुरू आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 झोपडपट्टीमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

आधुनिक सोयींसह नवी घरे

योजनेअंतर्गत यशवंत नगर, आंबेडकर नगर, विठ्ठलनगर, राजीव गांधी वसाहत, साईनाथ नगर आणि खराळवाडीतील भारतमाता नगर या झोपडपट्ट्यांचा विकास केला जात आहे. नागरिकांना 300 चौ. फुटांची घरे मिळत असून, त्यामध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृहे, पक्के रस्ते, लिफ्ट, सोलर प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, सीएनजी गॅस, सुरक्षा व्यवस्था आणि अंगणवाडी अशा सुविधा उपलब्ध आहेत.

या सोयींमुळे पावसाळ्यातील गळती, अस्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

सुरक्षित भविष्याची नवी दिशा

नवीन घरामुळे नागरिकांना स्थैर्य मिळाले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वातावरण, महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. अनेक कुटुंबांनी “गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आम्हाला हक्काचे घर मिळाले” असा आनंद व्यक्त केला.

दरम्यान, विठ्ठलनगरमधील रहिवाशांना तात्पुरते नेहरूनगरमधील एच.ए. मैदानावर स्थलांतरित करून पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. या उपक्रमामुळे नेहरूनगर परिसर झोपडपट्टीमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार करत असून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now