विद्यार्थ्यांनो, तक्रारखोर नको; एकाग्र, आनंदी आणि सकारात्मक राहा

पुणे: “आर्थिक समृद्धीचे मार्ग प्रामुख्याने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध होतात. त्यासाठी व्यक्ती आणि समाज, दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी समतोल समाज गरजेचा असतो. त्यातूनच वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनाला पूरक ठरणाऱ्या सर्जनशील वातावरणाची निर्मिती होते. समाजाचा समतोल व्यक्तींच्या मनाची एकाग्रता, सकारात्मकता आणि आनंदी मनोवस्थेवर अवलंबून असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तक्रारखोर न होता सकारात्मक, एकाग्र आणि आनंदी राहावे,” असा सल्ला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष, प्रख्यात रासायनिक अभियंता, अणुशास्त्रज्ञ आणि अध्यापक पद्मभूषण डाॅ. ज्येष्ठराज जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त शशिताई भाटे, परिषदेचे विनय र. र. व्यासपीठावर उपस्थित होते. ‘हवामान बदल, तापमानवाढ – अभिनव संशोधन आणि सर्जनशीलता’, असा डाॅ. जोशी यांच्या व्याख्यानाचा विषय होता. विद्यार्थी सहायक समितीच्या सेनापती बापट रस्त्यावरील शिवाजी हौसिंग सोसायटी संकुलात हे व्याख्यान झाले.

रंगीत पारदर्शिकांच्या साह्याने डाॅ. जोशी  विषयाची मांडणी केली. कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रोजन, मिथेन आणि फ्लोरिमेटेज वायू, यांचे प्रमाण वातावरणात अतिरिक्त झाल्याने जागतिक तापमानवाढीचे संकट घोंघावत आहे. त्यामध्ये कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू (गॅस) यांच्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होते. कार्बन उत्सर्जन कमी करणे, हाच उपाय आहे. मात्र, वास्तवात हे प्रदूषणकारी घटक अधिकाधिक वापरले जात असल्याचे चित्र, डाॅ. जोशी यांनी सर्वांसमोर ठेवले.

उद्योग, शेती आणि सेवाक्षेत्र हे देशाचे संपत्ती निर्माण करणारे प्रमुख स्रोत असतात. त्यापैकी उद्योग या क्षेत्रात आपला वाटा जागतिक पातळीवर एक टक्काही नाही. सेवा क्षेत्राद्वारा आपण प्रामुख्याने जगाची हमाली करतो. शेतीविषयी न बोललेले बरे, अशी अवस्था आहे. उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र, यांच्यात समन्वय नाही. शेतकरी तर कायमच नाडलेला असतो. प्रत्येक क्षेत्राचा सूर सदैव तक्रारीचा असतो आणि तक्रारी करणारा देश कधीच प्रगती करू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे सांगून डाॅ. जोशी म्हणाले, ‘तक्रारीचे सूर बंद करण्यासाठी स्वतःमधील एकाग्रता वाढवत न्या, स्वतःला आनंदी ठेवा, सकारात्मक राहा. तक्रारखोर माणसे कुठलीही नवनिर्मिती करू शकत नाहीत. केंद्र शासनाने भावी काळासाठी ५ अमृतबिंदू, ही भारताची बांधीलकी राहील, असे जाहीर केले आहे. २०३० पर्यंत भारत ५०० गिगावॅट बिगरजीवाश्म इंधन कमी वापरेल, अक्षय उर्जेद्वारा ५० टक्के उर्जेची बचत करेल, कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनांनी कपात करेल, कार्बन तीव्रता ४५ टक्क्यांपेक्षा कमी करेल आणि २०७० पर्यंत नेट झीरोचे उद्दिष्ट गाठेल, अशी ही पाच आश्वासने आहेत. बायोमास, रिफायनरीज त्याचप्रमाणे टायटॅनियम धातूच्या निर्यातीमधील मोठ्या शक्यता, कार्बन नॅनो ट्यूब्सची निर्मिती याविषयीचे विवेचनही डाॅ. जोशी यांनी केले. त्यातून बुलेटप्रूफ जॅकेट्सची आयात पूर्ण बंद करणे शक्य झाले असून, आता आपण ही जॅकेट्स निर्यात करू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.

समितीच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्यफीत सुरवातीला दाखविण्यात आली. समितीच्या डाॅ. ज्योती गोगटे यांनी व्याख्यानविषयाची माहिती दिली. भाटे यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमांची माहिती सांगितली. पल्लवी भोसले यांनी परिचय करून दिला. विनय र. र. यांनी आभार मानले, तर अमोल झीरमिले यांनी सूत्रसंचालन केले.