पुणे, २७ सप्टेंबर : अनधिकृत जाहिरातींनी गच्च भरलेला आपला परिसर मोकळा करण्याच्या उद्देशाने विमाननगरमधील रहिवाशांनी आज सकाळी स्वयंस्फूर्तीने फ्लेक्स काढण्याची मोहीम राबविली. भर पावसात सकाळी त्यांनी केवळ एका तासात सुमारे ४० ते ५० फ्लेक्स एकत्रितपणे हटवले.
लहान-मोठ्या फ्लेक्सनी ग्रासलेला व विद्रुप झालेला विमाननगरचा परिसर पुन्हा स्वच्छ करण्याचा निर्धार करून येथील अनेक नागरिक सकाळी ५.३० वाजता एकत्र जमले आणि ५.४५ वाजता त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेपूर्वी त्यांनी पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला फ्लेक्स काढून टाकण्यासंदर्भात विनंती केली होती. या विभागाने अलिकडेच खासगी क्लासेसचे काही फ्लेक्स काढले होते. मात्र उरलेले फ्लेक्स नवरात्रीनंतरच काढू, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दररोज वाढतच जाणाऱ्या या फ्लेक्सच्या समस्येमुळे नागरिकांनी मग स्वतःच कारवाईचा निर्णय घेतला.
फ्लेक्स काढताना एक चिंताजनक गोष्ट समोर आली. नवे फ्लेक्स जुन्या फ्लेक्सवरच चिकटवले गेले होते. त्यामुळे त्यांचे अनेक थर तयार झाले होते. मंदिरे, शाळा, बागा, दुकानांच्या पाट्या, नो पार्किंगचे फलक, अगदी विजेचे खांबसुद्धा फ्लेक्सनी पूर्णपणे झाकले गेले होते. कोणतीही सार्वजनिक आणि सामुदायिक जागा फ्लेक्सच्या तावडीतून सुटली नव्हती.
“ही समस्या एखाद्या विषाणूसारखी पसरत आहे. तिच्यावर कोणताही ताबा नाही. वाहतुकीचे फलक असो वा दुकानांची नावे, कुठलाही भाग वाचलेला नाही,” असे एका स्वयंसेवकाने सांगितले.
विमाननगरच्या नागरिकांनी स्पष्ट केले, की फ्लेक्स काढण्याची ही मोहीम राजकीय नसून सामाजिक आहे. दृश्य प्रदूषण कमी करणे आणि सार्वजनिक जागा पुन्हा स्वच्छ राखणे हा यामागचा उद्देश आहे. त्यांनी महापालिकेला वेळेवर आणि धाडसी पावले उचलण्याचे आवाहन केले. “पावसाचीही फिकीर न करता आम्ही जे करणे आवश्यक होते ते केले. आता महापालिकेने कठोर कारवाई करावी; जेणेकरून नागरिकांना हा त्रास एकट्याने सहन करावा लागू नये,” असे दुसरे एक रहिवासी म्हणाले.
“नो मोअर फ्लेक्स, नो मोअर मेस!” अशा घोषणा देत नागरिकांनी या मोहिमेचा शेवट केला. #FlexFreeVimanNagar या हॅशटॅगद्वारे त्यांनी याबाबत जनजागृती सुरू केली आहे. भविष्यात अधिकाधिक नागरिक यात सहभागी होतील, अशी त्यांना आशा आहे.