IMD Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे. विदर्भातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालं आहे.
अनेक गावांना पुराचा वेढा पडल्यानं संपर्क तुटला आहे, काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक अडकल्याचं पहायला देखील मिळत आहे. तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली आहे. यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुढील काही दिवस तरी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, आयएमडीकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात २० नवे जिल्हे आणि ८१ तालुके करण्याचा प्रस्ताव; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, सर्वत्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या मराठवाड्यात नांदेड वगळता सर्व सातही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भात देखील उद्या पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भाला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील गडचिरोली, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहेत. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.