Pune Police : गणेशोत्सवात आंदेकर-कोमकर टोळ्यांमधील संघर्षात आयुष कोमकर या तरुणाचा बळी गेल्याने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर नवरात्रोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे.
नवरात्राच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावत फक्त एका दिवसात तब्बल ४३ गुंडांना तुरुंगात पाठवले.
टोळी सदस्यांवर पोलिसांचे लक्ष्य
या कारवाईत आंदेकर-कोमकरसह विविध गुन्हेगारी टोळ्यांशी संलग्न आरोपींना जेलमध्ये रवानगी करण्यात आली. हत्यार कायद्याखाली गुन्हे दाखल असलेले, दारूबंदीतील आरोपी आणि खुनाच्या प्रयत्नाच्या कलम ३०७ अंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले गुंड यांचा यात समावेश आहे.
नवरात्रीसाठी कडक सुरक्षा
गणेशोत्सवातील घटनांचा अनुभव लक्षात घेऊन नवरात्र काळात पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. पूर्वगुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवत पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.