पत्नीला पतीच्या प्रेयसीकडून नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून संसार बिघडवला असल्यास त्याच्याकडून नुकसानभरपाई मागता येऊ शकते.

एका प्रकरणात पत्नीने पतीच्या कथित प्रेयसीविरोधात ४ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करत याचिका दाखल केली होती. तिचा आरोप होता की पतीच्या प्रेयसीमुळे त्यांच्या वैवाहिक नात्यात तणाव निर्माण झाला आणि संसार उद्ध्वस्त झाला.

कायदेशीर पार्श्वभूमी

  • एलियनएशन ऑफ अफेक्शन (Alienation of Affection) या संकल्पनेनुसार तिसऱ्या व्यक्तीमुळे नातेसंबंध मोडले तर पीडित जोडीदार नुकसानभरपाई मागू शकतो.

  • हा कायदा अँग्लो-अमेरिकन कॉमन लॉमधून आलेला असला तरी भारतातील विवाह कायद्यात थेट तरतूद नाही.

  • न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी स्पष्ट केले की, हिंदू विवाह कायदा किंवा कौटुंबिक न्यायालयात तिसऱ्या पक्षाविरुद्ध कारवाई करता येत नसली, तरी सिव्हिल कोर्टात नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करता येतो.

प्रकरणाचा तपशील

  • पती-पत्नीने २०१२ मध्ये लग्न केले आणि २०१८ मध्ये त्यांना जुळी मुले झाली.

  • आरोपी प्रेयसी ही पतीच्या कंपनीत अॅनालिस्ट म्हणून काम करत असताना त्यांची जवळीक वाढली. विवाहित असल्याचे माहित असूनही तिने संबंध ठेवले, असा पत्नीचा आरोप.

  • २०२३ मध्ये पतीने छळाचा आरोप करून घटस्फोटासाठी अर्ज केला, त्यानंतर पत्नीने प्रेयसीविरोधात नुकसानभरपाईची मागणी केली.

न्यायालयाचे निरीक्षण

  • प्रेयसीच्या वकिलांनी हा समांतर खटला असल्याचे सांगत दावा फेटाळण्याची मागणी केली होती.

  • परंतु न्यायालयाने स्पष्ट केले की, नातं संपवणं किंवा बदलणं हा गुन्हा नसला तरी त्यातून झालेल्या हानीसाठी भरपाई मागता येते.

  • घटस्फोटाची केस आणि नुकसानभरपाईची केस या स्वतंत्र असून एकमेकांवर परिणाम करणार नाहीत.

या निर्णयामुळे वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीमुळे झालेल्या भावनिक नुकसानीसाठी सिव्हिल कोर्टात नुकसानभरपाई मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.