“सरकार प्रमाणपत्र देईना”… लेकरांच्या भवितव्यासाठी बापाचा आत्महत्येचा निर्णय

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (वय 32) या तरुणाने मुलांसाठी महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी आपल्या मुलांसाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, आजतागायत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे मुलांना शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. कुटुंबाची जबाबदारी आणि वाढता तणाव सहन न झाल्याने त्यांनी शनिवारी संध्याकाळी विजेच्या तारेला धरून जीवन संपवलं.

सुसाईड नोटमधील वेदना
“माझी दोन लेकरं शिकत आहेत. मी मजुरी करून घर चालवतो. लेकरांना महादेव कोळीचं प्रमाणपत्र मिळत नाही. सरकार प्रमाणपत्र देत नाही. म्हणून मी करंटला धरून आत्महत्या करत आहे,” असे भावनिक शब्द मेळ्ळे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहेत.

या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून, कोळी महादेव समाजाच्या प्रमाणपत्र प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या भागात मल्हार कोळी व महादेव कोळी समाजाकडून जात प्रमाणपत्रासाठी संघर्ष सुरू आहे. इतर महाराष्ट्रात लागू असलेलेच निकष या भागात लागू करावेत आणि व्हॅलिडीटी प्रक्रिया सोपी करावी, यासाठी आंदोलन छेडले होते. येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडाभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर ही आत्महत्या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप देईल, अशी चिन्हे दिसत आहेत.