‘इस्सो नॅशनल गेम्स’तर्फे पुण्यात जलतरण स्पर्धेचे आयोजन

पुणे, १२ सप्टेंबर २०२५ : इंटरनॅशनल स्कूल्स स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (इस्सो) या संस्थेने २०२५-२६ या वर्षातील आपल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतर्गत श्री छत्रपती शिवाजी बालेवाडी क्रीडानगरीमध्ये जलतरण स्पर्धेचे नुकतेच भव्य आयोजन केले. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमावर चालणाऱ्या देशभरातील १५०हून अधिक शाळा यात सहभागी झाल्या. देशातील तरुण जलतरणपटूंसाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून या स्पर्धेने ‘इस्सो’ला पुन्हा अधोरेखित केले. स्पर्धेचे आयोजन सुरळीत झाले आणि खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रतिष्ठित स्पर्धांसाठी पात्र होण्याचा मार्ग खुला झाला.
अदानी समूहाच्या पाठिंब्यामुळे ‘इस्सो’चा २०२५-२६ हंगाम अधिक बळकट होत आहे. शालेय क्रीडा सुविधा आणि संधी देशभरात मजबूत करण्याच्या या समूहाच्या कटिबद्धतेचा हा भाग आहे.

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या शाळांसाठी पारदर्शक आणि प्रगत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ‘इस्सो’चे उद्दिष्ट आहे. यातून ती विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व जागतिक स्तरावर खेळण्याची संधी मिळवून देते. पुण्यातील ही जलतरण स्पर्धा ‘इस्सो’च्या ‘क्रीडेद्वारे कौशल्य संवर्धन आणि सर्वांगीण विकास’ या ध्येयधोरणाचे प्रत्यक्ष उदाहरण ठरली.

‘इस्सो’चे संचालक गौरव दीक्षित म्हणाले, “या हंगामात अधिकाधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांद्वारे फलदायी कामगिरी घडेल, अशी अपेक्षा आहे. इस्सो विद्यार्थी परिषदेसाठी आम्ही नवे कार्यक्रम आणि शिक्षक कौशल्यवृद्धीचे उपक्रम सुरू करीत आहोत. आपल्या खेळाडूंना पूरक अशी सशक्त परिसंस्था यातून निर्माण होईल.”

अहमदाबाद येथे बुद्धिबळ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून ही क्रीडा स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर आता पुण्याच्या जलतरण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. आता हा जल्लोष जयपूरकडे वळतो आहे. तेथे येत्या १७ सप्टेंबरपासून जयश्री पेरिवाल आंतरराष्ट्रीय शाळेत फुटबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धा होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उदयोन्मुख प्रतिभेला हे आणखी एक भक्कम व्यासपीठ मिळणार आहे. ‘इस्सो नॅशनल गेम्स’चा २०२५-२६ हंगाम अशा प्रकारे २०हून अधिक क्रीडास्पर्धांमधून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, तसेच जागतिक पातळीवर उजळून निघण्याच्या संधी उपलब्ध करून देत राहणार आहे.

‘इस्सो’विषयी : इंटरनॅशनल स्कूल्स स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (इस्सो) ही संस्था भारतातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी विश्वासार्ह मार्ग उपलब्ध करून देत आहे. यंदाच्या २०२५-२६ हंगामात अदानी समूहाचे ठाम पाठबळ इस्सोला मिळाले आहे आणि ‘इस्सो’च्या उद्दिष्टांशी ते सुसंगत आहे. त्यातून प्रत्येक खेळाडूला अधिकाधिक संधी आणि दृश्यमानता मिळू शकतील.