चिपळूण: (विलास गुरव) तालुक्यातील तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीसाठी ६३ कोटी रुपयांच्या निधीला सोमवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याने दसपटी विभागातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तर या धरणाच्या पुनर्बांधणी निधीसाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी विशेष सहकार्य करून चिपळूणवासींयांवर असलेले प्रेम सिद्ध केले आहे आणि ते ऋण आपण कधीच विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार शेखर निकम यांनी दिली आहे.
तिवरे येथील धरण २ जुलै २०१९ रोजी मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फुटून भेंदवाडीतील २४ जण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत माणसांसह जनावरेही वाहून गेली. वाडीतील अनेक घरे जमीनदोस्त झाली. काही क्षणातच ‘होत्याचे नव्हते’ झाले. या दुर्घटनेमुळे येथील ग्रामस्थांचा तो दिवस काळरात्र ठरला. या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी तिवरे धरण दुर्घटनास्थळी धाव घेत धरणग्रस्तांना मदतीचा हा दिला. तर शासन प्रशासनाने देखील सहकार्याचा हात दिला.
मात्र, या धरण फुटी नंतर येथील पंचक्रोशी पाण्याची टंचाई जाणवू लागली. यामुळे तिवरे धरणाची पुनर्बांधणी आवश्यक आहे, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून जोर धरू लागली. यासाठी आमदार शेखर निकम देखील शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर सोमवारी राज्यमंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी ६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे दसपटी विभागातून ग्रामस्थांनी आ. शेखर निकम यांना धन्यवाद दिले आहेत.
तिवरेवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला-आ. शेखर निकम
तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत ६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री ना. उदय सामंत, जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांनी महत्वपूर्ण सहकार्य केल्याने हा निधी मंजूर होऊ शकला आहे. एकंदरीत तिवरेवासियांना दिलेला शब्द पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शेखर निकम यांनी दिली आहे.