येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन
रायपूर – हिंदु जनजागृती समिती आणि पूज्य शदानी दरबार तीर्थ (रायपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसगडातील राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन रायपूर येथे उत्साही वातावरणात पार पडले. या अधिवेशनाला राज्यातील २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, संत, धर्मप्रेमी नागरिक, वकील, व्यापारी व राजकीय नेते उपस्थित होते. छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री मा. विष्णुदेव साय यांनी अधिवेशनात उपस्थितांना उद्देशून सांगितले, “छत्तीसगडमधील वाढती धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या विधानसभेत कठोर धर्मांतरविरोधी कायदा सादर करून अमलात आणण्यात येईल. तसेच नक्षलवादाच्या मुळावर घाव घालण्याचा आमचा निर्धार आहे.”
कार्यक्रमात पू. युधिष्ठिरलाल महाराज, पू. रामबालकदास महाराज, महामंडलेश्वर सर्वेश्वरदास महाराज, पू. वेदप्रकाशाचार्य महाराज, सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर या संत-महंतांसह मा. प्रबल प्रताप सिंह जूदेव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच स्वा. सावरकर यांचे नातू तथा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी आपले विचार मांडले.
श्री. सुनील घनवट म्हणाले, “राज्यात नक्षलवाद हळूहळू आटोक्यात येत असला तरी ‘अर्बन नक्षल’ अजूनही आपल्या समाजात अस्तित्वात आहेत. धर्मांतर करणाऱ्या शक्ती आणि नक्षलवादी विचारसरणी ह्यांच्यात फरक नाही. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून कठोर धर्मांतरविरोधी कायदा त्वरित लागू करणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद, गोहत्या, हलाल जिहाद यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे हाच एकमेव पर्याय आहे.”
धर्मांतरितांचे शुद्धीकरण, डिलिस्टिंग कायद्याची मागणी : प्रबल प्रताप सिंह जूदेव म्हणाले, “गोवा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मधून मोठी प्रेरणा मिळाली आहे. बस्तरमध्येही लवकरच धर्मांतरींत हिंदूंना स्वगृही आणण्याचा (घरवापसीचा) उपक्रम सुरू केला जाईल. तसेच ‘छद्म हिंदूं’ना उघड करण्यासाठी डिलिस्टिंग कायदा लागू केला पाहिजे.” त्यांनी स्व. दिलीपसिंह जूदेव यांच्या घरवापसी मोहिमेचा उल्लेख करत, “संस्कृती आणि धर्माचे रक्षण करणे हेच राजधर्म आहे,” असे ठामपणे सांगितले.
‘ॐ सर्टिफिकेट’चा प्रचार : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांचा अधिवेशनात सन्मान करण्यात आला. पू. अशोक पात्रीकर यांनी त्यांना श्रीकृष्ण प्रतिमा भेट दिली. श्री. सावरकर यांनी महाराष्ट्रात हलाल सर्टिफिकेट विरोधात सुरू केलेल्या ॐ सर्टिफिकेट मोहिमेची माहिती दिली आणि ही चळवळ छत्तीसगडमध्येही सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
धर्मांतरविरोधी कायद्यावर परिसंवाद : “धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात श्री. सुनील घनवट, पत्रकार योगेश मिश्र, माजी पोलीस महानिरीक्षक श्री. सुशील द्विवेदी, अधिवक्ता आशीष शर्मा व श्री. कमल बिस्वाल यांनी मार्गदर्शन केले. कायदा लागू होईपर्यंत सातत्याने कार्य करत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी श्री. आशीष परिडा, श्री. रोहित सिंह, श्री. कमल बिस्वाल यांचे विशेष साहाय्य लाभले. अधिवेशनात धर्मशिक्षण फलक, अध्यात्म, आयुर्वेद आणि राष्ट्ररक्षा विषयक ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.