राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधे कुटुंबाचा नवा गौप्यस्फोट; भावजयीच्या आरोपाने खळबळ

पुणे | सासरच्या मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात तिचे पती, सासू-सासरे, दीर आणि नंदण अशा सर्व आरोपींना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, यामध्ये फरार असलेले राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना लपवून ठेवण्यास मदत करणारा संकेत चोंधे हेही चर्चेत आले होते. मात्र, आता संकेत चोंधे याच्या कुटुंबाशी संबंधित आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, त्याच्या भावजयीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

संकेत चोंधेच्या भावजयीचा आरोप काय?

संकेत चोंधेचा भाऊ सुयश चोंधे याच्याविरोधात त्याच्या पत्नीने अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ पतीच नव्हे, तर सासू-सासरे आणि दीर – म्हणजेच चोंधे कुटुंबातील इतर सदस्यांविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. पीडितेने महिला आयोगाकडेही न्यायासाठी धाव घेतली होती.

फारकत घेतलेल्या भावाच्या बाजूने उभे राहिले संकेत चोंधे?

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवी प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला मदत करणाऱ्या संकेत चोंधेने थेट त्याच्या भावाच्या थार गाडीचा वापर करून फरार आरोपींना फिरवले. या कृतीमुळे तो पोलिसांच्या रडारवर आला होता. आता त्याच कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचेही आरोप समोर आल्याने चौकशी अधिकच खोलवर होण्याची शक्यता आहे.

पोलीस तपासात नव्या धाग्यांची शक्यता : पीडित महिला सध्या बावधन पोलीस ठाण्यात पोहोचली असून, तिने सविस्तर माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित आणि महिलांवरील अन्याय या दोन्ही घटनांनी पुणे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.