पुणे – विवाहित तरुणी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले असून, फरार आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर सासरच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.
प्रारंभी पोलिसांनी तिचे पती, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. त्यानंतर दीर आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार झाले होते. विशेष म्हणजे, वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी राजेंद्र हगवणे काही कार्यकर्त्यांसह रुग्णालयात दाखल झाला होता, मात्र गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच तो तातडीने फरार झाला.
दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून राजेंद्र हगवणे व त्याच्या साथीदार दीराला अटक केली. यानंतर आता या दोघांना फरार राहण्यासाठी मदत करणाऱ्या पाच जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये:
- कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील
- मावळ येथील फार्महाऊसचे मालक बंडू फाटक
- साताऱ्याच्या पुसेगावचे राहुल जाधव व अमोल जाधव
- तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे
- या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
प्रकरणाचे स्वरूप : वैष्णवी हगवणे हिचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर सासरच्यांकडून सतत छळ केला जात असल्याचा तिच्या नातेवाइकांचा आरोप आहे. छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी राजेंद्र हगवणेच्या मदतीला धावलेल्या प्रत्येकाला लक्ष्य करत चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.
ही कारवाई प्रकरणात न्यायाची दिशा निश्चित करण्यास महत्त्वाची ठरणार असून, पोलिसांकडून आणखी तपास सुरू आहे.