Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील विवाहित वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाल आहे. या प्रकरणात आता वैष्णवीचा पती, दीर, सासू-सासरा तसेच नणंद यांना अटक करण्यात आली आहे. 51 तोळे सोने फॉर्च्यूनर कार हुंडा म्हणून दिल्यानंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिचा छळ काही थांबवला नाही. याच त्रासातून नंतर तिने स्वत:ला संपवलं. दरम्यान, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेत लक्ष घातलं असून लवकरच या प्रकरणात मी एक मोठा खुलासा करणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलंय.
हगवणे कुटंबातील दुसरी सून मयुरी जगताप हिनेदेखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. माझा दीर, सासरा यांच्याकडून माझा छळ होत होता, त्यांच्याकडून मला मारहाण केली जायची असा खळबळजनक दावा तिने केलाय. यावरच दमानिय यांनी प्रतिक्रिया दिलीय. मयुरी ही विनाकारण आरोप करणार नाही. मयुरीच्या आई ने जे पत्र महिला आयोगाला लिहिले होते त्यात असेही लिहिले आहे, की राजेंद्र हगवणे यांनीसुद्धा तिला एकदा कानशीलात लगावली होती. तिचे कपडे फाडले होते. शशांकनेही जर असं केलं असेल तर ते अतिशय गंभीर आहे, असं दमानिया यांनी म्हटलंय. तसेच, हगवणे हे केवळ लोभी नाही तर विकृत कुटुंब असल्याचंही त्या म्हणाल्या. या कुटुंबाला राजकीय साथ होती आणि त्यांचे मामा जालिंदर सुपेकर यांचीही हगवणे कुटुंबाला साथ होती, असा दावा करत याबाबतचा मोठा खुलासा करणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय.
निलेश चव्हाण या व्यक्तीकडे बंदुकीचा जो परवाना होता, तो जालिंदर सुपेकर या व्यक्तीने दिला होता. निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकर यांनी जी मदत केली ती अतिशय धक्कादायक आहे. असे अधिकारी निलेश चव्हाण सारख्या माणसाला मदत करतात म्हणून वैष्णवीला सारख्या महिलांना प्राम गमवावे लागतात, असा हल्लाबोल दमानिया यांनी केला. तसेच या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
हगवणे प्रकरणात जसजसे खुलासे होत चालले आहेत, तसे खात्री पटत चाललीय की, यंत्रणा खूप सक्षम होणे गरजेचे आहे. आता राजकीय, पोलीस, मोठी माणसं यांचा दबाव आता बंद करण्याची गरज आहे, अशा भावनाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केल्या आहेत.