पुणे : गुन्हा घडला म्हणून माणसाचे आयुष्य संपत नाही; योग्य मार्गदर्शन, कौशल्य आणि संधी मिळाल्यास तो पुन्हा सन्मानाने समाजात उभा राहू शकतो, या विचाराला कृतीची जोड देत येरवडा खुले कारागृहात कैद्यांच्या पुनर्वसनासाठी ‘आत्मनिर्भर पथ’ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या संपूर्ण उपक्रमात येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली असून, कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून परिवर्तन आणि पुनर्वसनाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे या कार्यक्रमातून दर्शन घडले.
शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता ‘समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि येरवडा खुले कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि पुणे विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अधीक्षक शामकांत शेडगे यांनी येरवडा खुले कारागृहात राबविण्यात येत असलेल्या विविध पुनर्वसनात्मक उपक्रमांची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. नर्सरी, कॅन्टीन, धुलाई केंद्र, कपडे धुण्याचे केंद्र, कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन, मंगल कार्यालय यांसारख्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून बंद्यांना कामाचा अनुभव, कौशल्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘आत्मनिर्भर पथ’ प्रकल्पाच्या माध्यमातून या प्रयत्नांना आणखी व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. कैद्यांना केवळ शिक्षा भोगणारी व्यक्ती म्हणून न पाहता, त्यांच्यातील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, डिजिटल व आर्थिक साक्षरता वाढविणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे आणि मानसिक नकारात्मकता दूर करून समाजात जबाबदार नागरिक म्हणून पुनर्स्थापित करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांनी बंदी बांधवांच्या कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यांच्या मुलांना बालवर्गापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत केवळ दहा टक्के शुल्कात शिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच संपूर्ण कुटुंबासाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय विमा संरक्षण आणि कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोफत कायदेशीर सेवा उपलब्ध करून देण्याचे जाहीर करण्यात आले.
या घोषणांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. प्रकल्पाचे मुख्य आयोजक आणि आयसीआयसीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक जयंत हिरे यांनी ‘आत्मनिर्भर पथ’च्या २४ उद्दिष्टांचे सादरीकरण केले. ‘कैदी ते आत्मनिर्भर नागरिक’ हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रबोधनकार, अभिनेत्री व लेखिका मेघनाताई झुझम यांचे ‘मी तुमची सावित्रीबाई फुले’ हे एकपात्री नाटक. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करत त्यांनी बंदी बांधवांना परिवर्तनाची प्रेरणा दिली.
यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, ॲड. शार्दुल जाधवर, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, मेघनाताई झुझम, जयंत हिरे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अनहिता कपुर, अभिनेता जयराज मोरे, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे यांनी ‘पंखांनी काही होत नाही, उंच भरारीसाठी धैर्याची गरज असते’ या आशयाचा संदेश देत ‘आत्मनिर्भर पथ’ हा बंदी बांधवांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, तुरुंग अधिकारी निशा श्रेयकर, सुभेदार सुनील गायकवाड, दत्तात्रय चव्हाण, चंद्रकांत खांदवे, हवालदार राजेंद्र धनगर, भिमराव थोरात, प्रकाश भोसले, वैशाली थोरात, महिला शिपाई संध्या जाधवर, मोनिका लांडगे, सुरेखा म्हेत्रे, मिसबा सय्यद, याकुब शेख, वैभव पाटील, मोहसिन जमादार, विजयकुमार दिवेकर, तौफीक शेख, अशोक होले, राकेश पवार, निलेश मांढरे, महेंद्र लोहकरे आदींनी परिश्रम घेतले.
येरवडा खुले कारागृहात शिक्षेपेक्षा परिवर्तनाला आणि बंदिवानांपेक्षा त्यांच्या भविष्यातील आत्मनिर्भरतेला प्राधान्य देण्याच्या दिशेने ‘आत्मनिर्भर पथ’ प्रकल्पाने एक नवी पहाट उभी केली आहे. या परिवर्तनाच्या वाटचालीत अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या नेतृत्वाची भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.





