लोककलेचा गळा घोटणाऱ्या डीजे संस्कृतीला थांबवायला हवे; रघुवीर खेडकर

By: Editor_Manas

On: Friday, June 12, 2026 6:40 AM

Google News
Follow Us

पुणे : डीजे संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे तमाशा, लावणी, शाहिरी, लोकनाट्य आणि वगनाट्य यांसारख्या पारंपरिक लोककलांवर संकट ओढवले आहे. लोककला टिकवायची असेल, तर तिच्या संरक्षणासाठी समाजाने संघटितपणे आवाज उठविण्याची गरज आहे, अशी परखड अपेक्षा ज्येष्ठ लोककलावंत तथा ‘पत्रश्री’ पुरस्काराचे मानकरी रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली. प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असलेल्या तमाशासह लोककला जिवंत ठेवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटत राहणार असल्याचेही खेडकर यांनी नमूद केले.

लोककलेचे भूषण, महाराष्ट्राचे सुपुत्र, ज्येष्ठ तमाशा कलावंत, लोकशाहीर रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रुग्ण हक्क परिषद व कलाप्रेमी नागरिकांच्या वतीने मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते खेडकर यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल मेघराज राजेभोसले यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, पार्श्वगायक प्रा. गणेश चंदनशिवे, स्वागताध्यक्ष व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण, माजी सहायक पोलीस आयुक्त जानमहंमद पठाण, रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्षा अपर्णा साठे-मारणे आदी उपस्थित होते.

रघुवीर खेडकर म्हणाले, ‘‘लोककलावंताच्या वाट्याला असा सन्मान येणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. काहीजण आजही लोककलेकडे दुय्यम नजरेने पाहतात. त्यामुळे हा पुरस्कार माझा नसून, संपूर्ण लोककलेचा सन्मान आहे. माझ्या जन्माच्या अवघ्या पाचव्या दिवशी तमाशाच्या फडावर माझे पदार्पण झाले. आईने अपार कष्ट घेऊन मला घडवले. तिच्या हयातीत हा सन्मान मिळावा, यासाठी प्रयत्न केले; मात्र ते शक्य झाले नाही, ही खंत कायम राहील. काळानुरूप बदल आवश्यक असले, तरी डीजे लावणीने या लोककलेवर मोठा आघात केला आहे. एकेकाळी तमाशा लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते; आज मात्र वगनाट्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सुरेखा पुणेकर यांच्यासारख्या कलाकारांनी लावणीला जागतिक स्तरावर नेले; पण डीजे संस्कृतीमुळे या कलेच्या पुनरुज्जीवनाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातून लोककलेच्या संवर्धनासाठी आवाज उठला, तर तो दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. जिवात जीव असेपर्यंत तमाशा जिवंत ठेवण्यासाठी मी झटत राहणार आहे.’’

अध्यक्षीय भाषणात श्रीनिवास पाटील म्हणाले, “रघुवीर खेडकर यांचे कुटुंब हे लोककलेसाठी आयुष्य वेचणारे कुटुंब आहे. खेडकर लहान असताना त्यांच्या आई कांताबाई सातारकर माझ्याकडे आल्या होत्या. त्यावेळी त्यांना अर्थसहाय्य करण्याची संधी मिळाली आणि त्यातून त्यांचा तमाशा फड उभा राहिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या कुटुंबाने तमाशा, लावणी आणि गवळण यांसारख्या लोककलांचे जतन आणि संवर्धन केले. लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असून, अशा कलावंतांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणे ही समाजाची जबाबदारी आहे.”

उल्हास पवार म्हणाले, ‘‘लोककला ही ग्रामीण समाजजीवनाचा आत्मा आहे. रघुवीर खेडकर यांनी केवळ तमाशा सादर केला नाही, तर लोककलेचा सन्मान आणि अस्मिता जपण्याचे मोठे कार्य केले आहे. पद्मश्रीसारखा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे ही त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेची आणि लोककलेप्रती असलेल्या निष्ठेची पावती आहे. अशा कलावंतांचा गौरव होणे म्हणजे लोकपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या सर्व कलाकारांचा सन्मान होय. नव्या पिढीनेही या कलेचा वारसा जपण्यासाठी पुढे यावे, ही काळाची गरज आहे.’’

सुरेखा पुणेकर यांनी लावणीचा दर्जा घसरला आहे. आज रसिक नको त्या गोष्टींना डोक्यावर घेत आहेत. मात्र, काही काळापुरती रसिकांना आकर्षित करणारी ही गोष्ट आहे. कालांतराने लोक पुन्हा लावणी आणि लोककलेला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

मेघराज राजेभोसले यांनी मराठी लोककलेला प्रोत्साहन देणार असून, डीजेमुक्त लावणी व कार्यक्रम होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. प्रा. गणेश चंदनशिवे यांनीही मनोगत व्यक्त केले.

उमेश चव्हाण यांनी स्वागत-प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. जीवराज चोले यांनी आभार मानले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now