व्यवसायाभिमुख व रोजगारक्षम पिढीसाठी कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज; सचिंद्र प्रताप सिंह

By: Editor_Manas

On: Wednesday, June 10, 2026 10:09 AM

Google News
Follow Us

पुणे: “पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत काळानुरूप बदल अपेक्षित आहेत. रोजगारक्षम व व्यवसायाभिमुख पिढी घडवण्यासाठी, तसेच आधुनिक विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी अभ्यासक्रमासह व्यावहारिक आणि प्रात्यक्षिकांवर आधारित कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे,” असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. पदवीसह रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करावीत आणि शालेय वयातच विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी ९० तासांची इंटर्नशिप देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कौशल्य विकास आणि प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण देत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या ‘लेंड अ हंड इंडिया’ (लाही) संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात सचिंद्र प्रताप बोलत होते. पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित सोहळ्यात उद्योजक प्रतापराव पवार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. कमलादेवी आवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, ‘लाही’ संस्थेचे सहसंस्थापक सुनंदा माने व राज गिल्डा, अध्यक्ष मिलिंद माने आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी लाही संस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

सचिंद्र प्रताप सिंह यांनी विद्यमान शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप बदलणे गरजेचे असून, कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. पारंपरिक शिक्षणपद्धतीसोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अनुभव देणे अत्यावश्यक आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ कागदोपत्री काम न करता तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधणे गरजेचे आहे. बदल खऱ्या अर्थाने घडवायचा असेल, तर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. पालकांनीही मुलांवर स्वतःच्या अपेक्षा लादू नयेत. स्वतःच्या अभ्यासाची, कौशल्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असावे, असेही ते म्हणाले.

प्रतापराव पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील जागतिक स्पर्धेचा उल्लेख करत भारताने शिक्षणात तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. चीनने २००० सालापासूनच शिक्षणात एआय चा वापर सुरू करून मोठी झेप घेतली आहे. नवीन विचारांचा स्वीकार करून एकत्रित प्रयत्नातूनच मोठे बदल घडू शकतात. मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय व व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करावीत. समाजातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यात ‘लाही’सारख्या संस्थांचे योगदान मोठे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सुनंदा माने म्हणाल्या, “वीस वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कौशल्ये आणि तांत्रिक प्रशिक्षण द्यावे, या उद्देशाने काम चालू केले. राज्यातील शेकडो शाळांमध्ये प्रारूप प्रकल्प मॉडेल यशस्वी ठरल्याने महाराष्ट्र हे कौशल्याधारित शिक्षण व प्रशिक्षणाचे आदर्श राज्य ठरले. आता देशभरात २० हून अधिक राज्यांत हे मॉडेल कार्यरत असून, सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाकडे नेण्यात यशस्वी ठरले आहे. तीन जणांपासून सुरु झालेला प्रवास आता ३०० पेक्षा अधिक कुशल प्रशिक्षक आणि शेकडो कार्यकर्त्यांवर गेला आहे. भविष्यात अधिकाधिक शाळा आणि विद्यार्थी सामावून घेण्याचा प्रयत्न संस्था करत राहील.”

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात विद्यार्थ्यांचे चर्चासत्र झाले. प्राजक्ता चौधरी, भाग्यश्री, सावन पहारे आणि गुंजन हिवरकर या विद्यार्थ्यांनी पदवी आणि शालेय शिक्षणक्रमासोबत ‘लाही’ संस्थेच्या वतीने मिळालेल्या कौशल्याधारित प्रशिक्षणाची माहिती दिली. अयान पठाण आणि अनिता ढाले या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. राज गिल्डा यांनी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, देणगीदार, हितचिंतक यांचा परिचय करून दिला. मिलिंद माने यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उद्योग, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026