भारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं. देगलूरकर

By: Editor_Manas

On: Monday, June 8, 2026 9:18 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, पुणे : भारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी असल्याचे उत्तम उदाहरण इंडोनेशिया या देशावरून दिसून येते. आम्ही धर्माने मुस्लिम असलो. तरी संस्कृतीने हिंदू आहोत,” असे इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अभिमानाने सांगितल्याचे ज्येष्ठ पुरातत्व तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी नमूद केले.

प्राचीन इंडोनेशियातील हिंदू-बौद्ध संस्कृती, परंपरा आणि राजसत्तेचा इतिहास उलगडणाऱ्या ‘सुवर्णद्वीप : हिंदू बुद्धीस्ट किंग्डम्स् ऑफ एन्शंट इंडोनेशिया’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयसीएचआरचे माजी अध्यक्ष डॉ. ए. पी. जामखेडकर यांच्या हस्ते आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं.देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. पुस्तकाच्या लेखिका ऋता उंबरजे आणि सहलेखिका संगीता चाफेकर, तसेच डाॅ. अंबरीष खरे, विभा ओक, प्रकाशक पराग पुरंदरे आदि मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रभावाची अनेक उदाहरणे दिली. इंडोनेशियातील सांस्कृतिक जीवनात रामायण आणि महाभारत आजही जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी महर्षी अगस्तींच्या इंडोनेशियातील कार्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या इंडोनेशियाशी संबंधित आठवणींचाही उल्लेख केला.

डॉ. जामखेडकर यांनी इंडोनेशियातील मंदिरांबद्दल लोकांच्या मनात आजही असलेली पावित्र्याची भावना अधोरेखित केली. इस्लामधर्मीय बहुसंख्य देश असूनही तेथील हिंदू मंदिरांचे संवर्धन आणि जतन करण्यात आले आहे. दक्षिण-पूर्व आशियातील भारतीय संस्कृतीच्या प्रभावाचा अभ्यास करताना काही पाश्चात्त्य इतिहासकारांनी या प्रदेशाला ‘इंडियनाइज्ड स्टेट्स ऑफ साउथ-ईस्ट एशिया’ असे संबोधल्याचा उल्लेख त्यांनी केला.

ऋता उंबरजे यांनी जावा आणि बाली बेटांवरील भारतीय संस्कृतीच्या प्रभावाची उदाहरणे दिली. रामायण, महाभारत आणि पुराणकथांतील मूळ भारतीय संकल्पना स्थानिक समाजाने स्वीकारून आपल्या सांस्कृतिक संदर्भात त्यांचे रूपांतर केले. पात्रांची नावे आणि काही तपशील बदलले असले तरी मूळ विचार भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले. जावा येथील मंदिरांमध्ये रामायणाचे भव्य शिल्परूप दर्शन घडते, असेही त्यांनी नमूद केले.

संगीता चाफेकर यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीचा प्रसार हा आक्रमणातून नव्हे तर व्यापार, धर्म, तत्त्वज्ञान, कला आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे झाला. भारतीय व्यापारी आणि विद्वानांनी आग्नेय आशियात विचार व परंपरा पोहोचवल्या. स्थानिक संस्कृतींसोबत झालेल्या संवादातून तेथे एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा विकसित झाली. भारतीय संस्कृती ही संवाद साधणारी असून ती कोणावरही लादली जात नाही, असे त्यांनी नमूद केले.

डाॅ. अंबरीष खरे यांनी इंडोनेशियाचा अभ्यास करताना तेथील भाषा, कला, स्थापत्य, शिलालेख, इतिहास आणि भूगोलाचा सखोल अभ्यास केल्याचे सांगितले. इंडोनेशियामध्ये आजही भारतीय संस्कृतीचा प्रभाव अनेक ठिकाणी जाणवतो. देशाचे राष्ट्रीय प्रतीक ‘गरुड’ असून त्यावरूनच राष्ट्रीय विमानसेवा ‘गरुडा’चे नाव ठेवण्यात आले आहे. इस्लाम धर्म स्वीकारलेल्या अनेक कुटुंबांमध्येही हिंदू परंपरेबद्दल आदरभाव असून भगवद्गीतेसारख्या ग्रंथांची ओळख नव्या पिढीला करून दिली जाते, असे त्यांनी सांगितले.

कंबुज पुस्तकाच्या मराठी अनुवादक विभा ओक यांनी भारतीय संस्कृती, कला आणि स्थापत्याचा आशियातील व्यापक वारसा अधोरेखित केला. दोन्ही लेखिकांनी विषयाचा सखोल अभ्यास करून पुस्तक लिहिले असून अनुवाद करताना प्राचीन भाषांतील शब्दांचे अचूक अर्थ आणि उच्चार समजून घेणे आव्हानात्मक होते, असे त्यांनी सांगितले. मराठी वाचक या पुस्तकाच्या अनुवादाची आतुरतेने वाट पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 6, 2026

July 6, 2026

July 6, 2026

school-holidays-1-jpg-1731597974

July 6, 2026

July 5, 2026

July 4, 2026