सनदी लेखापालांवर देशाचे आर्थिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे दायित्व

By: Editor_Manas

On: Sunday, May 24, 2026 6:09 AM

Google News
Follow Us

पुणे: “भविष्यात सनदी लेखापाल म्हणून स्वतंत्र व्यावसायिक होण्यावर लक्ष केंद्रित करा,” असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रदीप भार्गवा यांनी नवोदित सनदी लेखापालांना दिला. ‘सरकारी, खासगी किंवा सामाजिक क्षेत्रांत सनदी लेखापाल म्हणून काम करताना, संवेदनशीलता, नैतिकता, माणुसकी जपून सीए पदाची प्रतिष्ठा कायम राखा’, असेही त्यांनी सांगितले. देशाचे आर्थिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे दायित्व सनदी लेखापालांवर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने आयोजित दीक्षांत सोहळ्यात डॉ. भार्गवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बाणेर येथील बंटारा भवनात आयोजित सोहळ्यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य व दीक्षांत सोहळ्याचे मुख्य समन्वयक सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए राजेश आगरवाल, सीए अभिषेक धामणे, सीए रेखा धामणकर, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए प्रणव आपटे, उपाध्यक्ष सीए निलेश येवलेकर, ‘विकासा’ चेअरपर्सन सीए सारिका दिंडोकर आदी उपस्थित होते. या सोहळ्यात ६५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आली.

डॉ. प्रदीप भार्गवा यांनी सरकारी, खासगी आणि सामाजिक क्षेत्रांत करत असलेल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव सांगितला. सनदी लेखापाल म्हणून देशात आणि विदेशांत अनेक महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया मोठ्या संख्येने कार्यरत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे, असे सांगून ते म्हणाले, सीए म्हणून तुम्ही कोणत्याही आस्थापनेसाठी कार्य करा, ‘डूईंग वेल’ ऐवजी ‘डूईंग गुड’, अशी वाटचाल असली पाहिजे. कुठलीही जबाबदारी उत्कृष्ट पद्धतीने सांभाळा. सनदी लेखापाल म्हणून विविध संधी तुमच्यापुढे आहेत, त्यापैकी किमान एका क्षेत्रात सर्वोच्च तज्ज्ञता प्राप्त करा. प्रत्येक टप्प्यावर वास्तविकता आणि यथातथ्यता, (ॲक्च्युअल आणि फॅक्च्युअल) समजून घ्या. काम करताना, बजेट आणि नफा-तोट्याची तसेच वेळाची बंधने काटेकोरपणे पाळा. वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाशी मैत्री करा, स्वतःला सातत्याने अपडेटेड ठेवा, असे ते म्हणाले.

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी संस्था असा ‘आयसीएआय’चा लौकिक आहे. संस्था संख्यात्मक आणि गुणात्मक, दोन्ही पातळ्यांवर विश्वासार्ह मानली जाते. जगभरात कुठेही काम मिळवून देणारे हे क्षेत्र आहे. ऑडिट, फाईलिंगसह स्टाॅक मार्केट, बॅकिंग, फायनान्स, कायदा, स्टार्ट अप्स…असंख्य प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. ज्ञान हेच तुमचे भांडवल आहे, काळानुरूप वर्तणूक आणि बदलांचा स्वीकार, हे यशाकडे नेणारे मार्ग आहेत. नाविन्याचा ध्यास, सर्वोत्कृष्टतेची आस आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन, ही त्रिसूत्री अंगिकारून पॅशन व ऑक्यूपेशन यांची सांगड घाला, असा सल्ला चितळे यांनी दिला.

सीए प्रणव आपटे म्हणाले, “आजचा समारंभ हा विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव करणारा आहे. बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात अकाउंट्स क्षेत्र केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून जबाबदारी, पारदर्शकता आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाधारित जगात विद्यार्थ्यांनी सतत नवीन कौशल्ये आत्मसात करत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक हीच आयुष्यातील सर्वात मौल्यवान आणि कायम उपयोगी ठरणारी गुंतवणूक आहे.”

सीए राजेश अग्रवाल म्हणाले, “पदवीदान हा केवळ शिक्षण पूर्ण झाल्याचा क्षण नसून नव्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात आहे. आत्मविश्वास, आत्मसन्मान, कुटुंबीयांचे पाठबळ आणि आरोग्य यांना जीवनात विशेष महत्त्व आहे. मोठी स्वप्ने पाहा, मेहनत करा आणि यश मिळाल्यानंतरही नम्रता जपा. व्यावसायिक यशासोबतच शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असून, छंद आणि आवडीनिवडी जोपासल्याने जीवनात सकारात्मकता आणि सर्जनशीलता वाढते.”

सीए रेखा धामणकर यांनी नोकरीपेक्षा व्यावसायिक होण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. नोकरीपेक्षा स्वतःचा ब्रँड घडवणे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या. सीए अभिषेक धामणे यांनी जगात कुठेही काम करताना आपण आयसीएआयचे विद्यार्थी आहोत, हे सदैव लक्षात ठेवा, असे सांगितले. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए सारिका दिंडोरकर यांनी आभार मानले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 24, 2026

May 24, 2026

May 24, 2026

May 24, 2026

May 24, 2026

May 23, 2026