बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन विवाहित तरुणीवर अत्याचार करून तिला गावाच्या चावडीसमोर खांबाला बांधून ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रात्री आपल्या पतीसोबत घरी झोपलेली असताना आरोपी वैभव पटेकर घरात घुसला. त्याने तरुणीला जबरदस्तीने उचलून गावाबाहेर नेले आणि नदीपात्राजवळ तिच्यावर अत्याचार केला. या घटनेदरम्यान तरुणीने ओरडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिचे तोंड दाबून धरल्याने तिला मदत मागता आली नाही.
अत्याचारानंतर आरोपीने त्या तरुणीला गावात आणून चावडीसमोर खांबाला दोरखंडाने बांधून ठेवले. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर तरुणीने मदतीसाठी आर्त हाक दिली. मात्र, काही काळ गावकऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे. अखेर नातेवाईकांनी घटनास्थळी येत तिची सुटका केली.
ही घटना १० मार्च रोजी घडली होती. मात्र भीतीपोटी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दोन दिवस ही बाब लपवून ठेवली. त्यानंतर पीडित तरुणीने आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वैभव पटेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलीस तपासात पीडित तरुणी ही १७ वर्षांची अल्पवयीन असून तिचा बालविवाह झालेला आहे, अशी माहिती समोर आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील व्हिडीओमध्ये तरुणीच्या हातापायांना दोरखंड बांधल्याचे दिसत असल्याने या घटनेत इतर काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.





