Pune Metro : अखेर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो जुलैमध्ये धावणार; एकूण २३ किमीची टप्पा गाठणार, ट्राफिकही कमी होणार
पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडीमेट्रो प्रकल्पातील २३ किमींपैकी हिंजवडी ते बालेवाडी फाटा हा १२ किलोमीटरचा मार्ग मे महिन्यात सुरू होणार आहे तर उर्वरित बालेवाडी फाटा ते शिवाजीनगर हा ११ किलोमीटरचा मेट्रो मार्ग जुलैमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मेट्रो भवनच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. यामुळे आता शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो जुलैमध्ये धावणार असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी पीपीपी तत्त्वावर ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ या कंपनीला हे काम दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चअखेरपर्यंत हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, अनेक मेट्रो स्थानकांची कामे मोठ्या प्रमाणात शिल्लक होती. शिवाय हा संपूर्ण मार्ग एकाच टप्प्यात सुरू करणार होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सूचना दिल्या होत्या. परंतु, या मार्गावरील अनेक मेट्रो स्थानकांची कामे अजून सुरू आहेत. शिवाय काही ठिकाणी अर्धवट कामे आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचा मुहूर्त हुकला आहे. दुसरीकडे अनेक मेट्रो स्थानकांचे प्रवासी जिने व लिफ्ट जोडण्याचे काम सुरू आहे. या कामाला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही महिने तरी कोंडीतच प्रवास करावा लागणार आहे.
प्रवासी त्रस्त
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग आयटीयन्सना सोयीचे ठरणार आहे. यामुळे हा मार्ग कधी सुरू होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, हा मेट्रो मार्ग सुरू होण्यास आता तीन वेळा मुहूर्त हुकला आहे. याचा फटका वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांना बसत आहे. पहिल्या टप्प्यात मे महिन्यात केवळ १२ किमी मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तरी पूर्ण मार्ग सुरू झाल्यावरच या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
प्रमुख भागांत ‘टनेल नेटवर्क’
मेट्रोसह आम्ही ‘मल्टी-मोडल’ ट्रान्सपोर्टेशनवर भर देत आहोत. मेट्रोसोबत बस सेवांचे एकत्रीकरण करण्यात येत असून, पुण्यातील प्रमुख भागांत ‘टनेल नेटवर्क’ (बोगद्यांचे जाळे) उभारण्यात येणार आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे पुण्याच्या वाहतुकीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आम्हाला हक्काचे घर मिळाले : श्रावण हर्डीकर
सन २०१६ मध्ये मेट्रोचे काम सुरू झाले. परंतु, गेल्या १० वर्षांत कामासाठी मेट्रो कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणे बदलावी लागली. आज मेट्रो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. त्यांच्यासाठी हक्काच घर म्हणजे मेट्रो भवनचे उद्घाटन झाले. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो फायद्याची आणि सुरक्षित ठरत आहे, असे श्रावण हर्डीकर म्हणाले.
मेट्रो भवन : ठळक वैशिष्ट्ये
– एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,१५० चौ. मीटर
– भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी कला स्थापना.
– अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.
– ३१२ आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.
– काच दर्शनी भागामुळे नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.





