LPG Gas Shorage: आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारताच्या आयात-निर्यातीवर मोठ्या प्रमाणत दिसून येत आहे. या युद्धांचा मोठा परिणाम भातातील उर्जा स्त्रोतांवरदेखील दिसून येत आहे. परिणामी LPG गॅसचा तुटवडा पडल्यामुळे शासनाने हॉटल व्यवसायीकांचा गॅस पुरवठा तात्पूरत बंद केला. पुण्यातील हॉटेल उद्योगही सध्या इंधन टंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा अनियमित होणे, वाढते खर्च आणि सुरक्षिततेचे प्रश्न यामुळे अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स अडचणीत आली आहेत. याच पर्श्वभूमीवर आता सरकारने नवीन धोरण समोर आणले आहे. या धोरणात नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घ्या
LPG गॅस टंचाई दरम्यान Maharashtra Natural Gas Limited (MNGL) ने पुढाकार घेत हॉटेल व्यावसायिकांसोबत संवाद साधला आहे. पाइप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शनचा वापर वाढवून या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या संदर्भात हॉटेल उद्योगाशी संबंधित संघटना आणि MNGL अधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून, त्यातून अनेक व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एलपीजी टंचाईची पार्श्वभूमी
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर दिसू लागला आहे. त्यामुळे ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ म्हणजेच LNG च्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. या परिस्थितीचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही होत आहे.
याच पार्श्वभूमीवर Ministry of Petroleum and Natural Gas (MoPNG) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी दैनंदिन वापरात 100 टक्के सीएनजी उपलब्ध राहील याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र व्यावसायिक वापरासाठी सध्या सुमारे 80% पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला पर्यायी उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी Maharashtra Natural Gas Limited आणि National Restaurants Association of India यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक पुण्यातील YASHADA येथील सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत MNGL चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर यांनी जागतिक परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की रेस्टॉरंट्सचे कामकाज थांबू नये यासाठी MNGL सर्व हॉटेल्सना प्राधान्याने PNG कनेक्शन देण्यास तयार आहे.
दीर्घकालीन उपाय म्हणून PNG
MNGL चे संचालक (कमर्शियल) मेजर शंकर करजगी यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट करताना सांगितले की उद्योगाच्या वाढीसाठी दीर्घकालीन आणि सुरक्षित ऊर्जा उपाय आवश्यक आहेत. पाइप नॅचरल गॅस हा त्यासाठी विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
MNGL च्या स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर यांनी देखील या संकटकाळात हॉटेल उद्योगाला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की व्यवसाय सुरळीत चालू राहावा यासाठी कंपनी सर्व प्रकारचे सहकार्य करेल.
बैठकीदरम्यान अनेक हॉटेल मालकांनी आपले अनुभव आणि अडचणी मांडल्या. ‘मलका स्पाइस’चे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल चंद्रवरकर आणि ‘पुणे गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार यांनी MNGL च्या या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यांनी सांगितले की सध्याच्या संकटात MNGL ने घेतलेली ही भूमिका हॉटेल उद्योगासाठी एक प्रकारचे ‘रेस्क्यू मिशन’ ठरू शकते. बैठकीदरम्यान झालेल्या सादरीकरण आणि प्रश्नोत्तर सत्रानंतर अनेक व्यावसायिकांनी PNG कनेक्शन घेण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली.
या बैठकीनंतर अनेक रेस्टॉरंट्सनी MNGL कनेक्शनसाठी तत्काळ नोंदणी करण्यास सुरुवात केली. कंपनीच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या पुढाकारामुळे पुण्यातील 200 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्सना लवकरच पाइप नॅचरल गॅस कनेक्शन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलपीजीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
हॉटेल व्यावसायिकांना PNG कनेक्शन सहज मिळावे यासाठी MNGL ने काही सवलती जाहीर केल्या आहेत.
यामध्ये अर्जांची जलद छाननी आणि व्यवहार्यता तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अनामत रक्कम आणि सेटअप खर्चात मोठी सवलत देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
याशिवाय विविध परवानग्या आणि तांत्रिक प्रक्रियांमध्येही कंपनीकडून पूर्ण सहकार्य दिले जाणार आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यवसायिकांनी या पर्यायाकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे.
या महत्त्वाच्या बैठकीला MNGL चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, डारेक्टर (कमर्शियल) मेजर शंकर करजगी, स्वतंत्र संचालिका बागेश्री मंठाळकर, रितेश इंगोले तसेच National Restaurants Association of India चे अध्यक्ष सैली जहागीरदार उपस्थित होते.
याशिवाय ‘मलका स्पाइस’चे प्रफुल्ल चंद्रवरकर, ‘पुणे गेस्ट हाऊस’चे किशोर सरपोतदार आणि असोसिएशनचे इतर पदाधिकारी यांच्यासह 150 पेक्षा जास्त सभासदांनी सहभाग घेतला. या संवादामुळे ऊर्जा टंचाईच्या काळात हॉटेल उद्योगाला एक पर्यायी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





