LPG Aadhaar e-KYC Rule
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता आधार आधारित ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. एलपीजी सेवा आणि अनुदान (सबसिडी) अखंडपणे मिळत राहण्यासाठी सर्व ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
सरकारच्या माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया आता अधिक सोपी करण्यात आली आहे. ग्राहकांना एलपीजी वितरकाकडे जाण्याची गरज नसून ही प्रक्रिया स्मार्टफोनद्वारे घरबसल्या काही मिनिटांत पूर्ण करता येते.
हा नियम सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी कनेक्शनसाठी लागू आहे. यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांच्या ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांनी आपल्या एलपीजी कनेक्शनशी आधार क्रमांक जोडून बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया
ई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांनी पुढील पायऱ्या पूर्ण कराव्यात –
-
आपल्या एलपीजी कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप डाउनलोड करा.
-
त्यासोबत Aadhaar FaceRD ॲपही डाउनलोड करा.
-
मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडीच्या साहाय्याने लॉगिन करा.
-
‘आधार ई-केवायसी’ किंवा ‘ऑथेंटिकेशन’ हा पर्याय निवडा.
-
चेहरा पडताळणी (फेस ऑथेंटिकेशन) पूर्ण करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांचे ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण होते.
ई-केवायसी न केल्यास अडचणी
सरकारने स्पष्ट केले आहे की, वेळेत ई-केवायसी पूर्ण न केल्यास एलपीजी सबसिडी मिळण्यात अडथळे येऊ शकतात किंवा सिलेंडर बुकिंग व सेवांवर परिणाम होऊ शकतो.
म्हणून सर्व ग्राहकांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर मोबाईलद्वारे प्रक्रिया करता आली नाही, तर ग्राहकांनी जवळच्या एलपीजी वितरकाकडे जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून घेता येईल.





