पुणे : पुणे शहरात वाढलेल्या बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात शहरातील सर्व बेकायदा फलक काढण्यात येणार असून, असे फलक लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.
या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तालयात महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह महापालिका व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, शहरात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर बेकायदा फलक लावत आहेत. त्यामुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून प्रतिमेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे अशा फलकांवर कारवाई करण्यासाठी विशेष धोरण आखण्यात आले असून फलक तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांची यादीही तयार करण्यात आली आहे.
पावसाळ्यापूर्वी ४०० ठिकाणी कामे
बैठकीत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांवरही चर्चा झाली. शहरात पाणी साचणाऱ्या सुमारे ४०० ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून त्यांची यादी महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बेवारस वाहनांवरही कारवाई
शहरातील रस्त्यांच्या कडेला दीर्घकाळ उभी असलेली बेवारस वाहने वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. महापालिकेची पथके ही वाहने उचलून नेतील आणि त्याचा खर्च संबंधित वाहनमालकाकडून वसूल केला जाईल, असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
शाळांच्या परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्धही कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर विद्रुप करणारे फलक, बेवारस वाहने आणि इतर गैरप्रकारांवर कारवाई करून शहरात शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
अतिक्रमणांवरही कठोर कारवाई
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले की, शहरातील अतिक्रमणांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यात अधिकृतपणे २२ हजार पथारी व्यावसायिक नोंदणीकृत असताना प्रत्यक्षात पाच ते सहा लाख बेकायदा पथारी व्यावसायिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करून अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवले जाईल.
शहराचा नावलौकिक वाढविणे आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





