Hardik Pandya in Controversy; Complaint Filed in Pune Alleging Disrespect to National Flag
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ल्ड कप विजयानंतर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळाडूंचा जल्लोष सुरू असताना पांड्या त्याची कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत दिसला होता. दोघे मैदानात फिरताना आणि एकमेकांना किस करतानाचे दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र त्यानंतर दोघे स्टेजवर जाऊन झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यातून वाद निर्माण झाला आहे.
या घटनेवेळी हार्दिक पांड्याच्या गळ्यात भारतीय तिरंगा होता. त्यामुळे तिरंग्याचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पुण्यातील वडगाव शेरी येथील अॅडव्होकेट वाजेद खान यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे, वर्ल्ड कप विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पांड्याने भारतीय तिरंगा अंगावर घेत मैदानाच्या एका कोपऱ्यात झोपल्याचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कृतीमुळे भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला असून राष्ट्रीय गौरव अवमान प्रतिबंधक अधिनियम १९७१ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीसोबत संबंधित फोटो आणि व्हिडिओ पुरावेही जोडण्यात आल्याचे अर्जदाराने सांगितले आहे. दरम्यान, पुण्याबरोबरच बंगळुरूमध्येही एका सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती समोर येत आहे.
या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी सांगितले की, हार्दिक पांड्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वकिलांनी दिलेला तक्रार अर्ज स्वीकारण्यात आला असून पुढील तपासानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.





