पुणे/मुंबई : राज्यातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांवर मोठे संकट ओढावले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही भागांत हॉटेल्स बंद पडू लागली असून उद्योगांनाही उत्पादन कमी करण्याची वेळ आली आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आणि गॅस पुरवठा साखळीतील अडचणींमुळे महाराष्ट्रात गॅस टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच केंद्र सरकारने ५ मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी साठ्यावर काही निर्बंध घातल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
मुंबईत हॉटेल्स बंद
मुंबईतील दादर, प्रभादेवी परिसरात काही इमारतींमध्ये घरगुती गॅस पाईपलाईन अचानक बंद झाल्याच्या घटना घडल्या. व्यावसायिक गॅसचा पुरवठा कमी झाल्याने शहरातील सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद झाली आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद अली रोड परिसरातील अनेक हॉटेल्स व बेकऱ्याही बंद झाल्या आहेत.
पुण्यात मेस-खानावळी अडचणीत
पुण्यात अनेक हॉटेल्सनी मेनूमधून डोसा-इडलीसारखे पदार्थ काढून टाकले आहेत. मेस आणि खानावळ व्यवसायिकांना सर्वाधिक फटका बसत असून काही ठिकाणी फक्त एक दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. शहरात सुमारे ८ ते १० हजार हॉटेल व्यवसायिक असून परिस्थिती अशीच राहिली तर हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नसमारंभांवर परिणाम
गॅसच्या कमतरतेमुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या हजारो लग्नसोहळ्यांच्या ऑर्डर केटरर्सनी रद्द करण्यास सुरुवात केली असून परिस्थिती कायम राहिल्यास लग्न पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्योगांनाही फटका
छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी परिसरात गॅस अभावी सुमारे ३० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योगांवर विशेष परिणाम होत असून अनेक कंपन्यांकडे दोनच दिवसांचा गॅस साठा उरला आहे.
कोल्हापूर, नागपूर, नाशिकमध्येही तुटवडा
कोल्हापुरात सिलेंडर बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आल्याने नागरिक त्रस्त आहेत. नागपूरमध्ये रस्त्यावर अन्न विक्री करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. नाशिकमध्ये पुढील २४ तासांत ८० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाची कारवाई
राज्यात विविध ठिकाणी साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नये आणि गरज असल्यासच सिलेंडर बुक करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या गॅस पुरवठा कधी सुरळीत होणार, हॉटेल व उद्योग व्यवसाय कितपत प्रभावित होणार आणि घरगुती ग्राहकांनाही मोठा तुटवडा भासणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.





