शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन व ‘नेट-झिरो’साठी पुढाकार

पुणे: शाश्वत विकास, पर्यावरणाचे संवर्धन, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासह २०७० पर्यंत भारताने ठेवलेले ‘नेट-झिरो’चे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हरित व पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी पुणेस्थित ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व नॉर्वेस्थित ईपीडी ग्लोबल यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण ठरेल. शाश्वत विकासासाठी घेतलेला हा पुढाकार आहे,” अशी माहिती ग्रीन सोल्यूशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे आणि आरती भोसले-अहिवळे दिली.

ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यामध्ये पर्यावरणीय उत्पादन घोषणेची ( एन्व्हायर्नमेंटल प्रॉडक्ट डिक्लेरेशन-ईपीडी) सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक करार करण्यात आला. ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊआन आणि ‘ग्रीनएक्स’चे सागर अहिवळे व आरती भोसले-अहिवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते. तीन वर्षांकरीता हा करार झाला असून, भारतीय उद्योगसमूहांनी तयार केलेल्या उत्पादनांचे पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ईपीडी ग्लोबलमार्फत अधिकृतपणे ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल करणार आहे. संबंधित उत्पादनाचा ईपीडी दस्तऐवज त्या उत्पादनावर, तसेच उत्पादकाच्या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

आरती भोसले-अहिवळे म्हणाल्या, “या सहकार्यातून ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल भारतातील ईपीडी जनरेशन सेवांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहे. यामुळे देशभरात पर्यावरणीय उत्पादन विस्ताराला गती मिळणार आहे. शाश्वत विकास, पर्यावरणीय पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरण अहवाल व मानदंड यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या दोन्ही संस्था एकत्र येत आहेत. या उपक्रमातून भारतात अधिक जबाबदार, हरित आणि नवोन्मेषी उद्योगसंस्कृती घडविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ग्रीनएक्सने गेल्या काही वर्षांत रसायने, अभियांत्रिकी, धातू, अन्न उद्योग अशा विविध क्षेत्रांतील ५० पेक्षा अधिक व्यवसायांसोबत ईपीडी प्रकल्प राबविले आहेत. ईपीडी ग्लोबलसोबतचा करार भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा उपलब्ध करून देईल आणि प्रमाणपत्रांच्या खर्चात सुमारे ७० टक्के घट होईल.”

सागर अहिवळे म्हणाले, “भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगांचे जागतिक बाजारातील प्रदर्शन उल्लेखनीय आहे. ईपीडी असलेली उत्पादने जगभरात अधिक प्राधान्याने स्वीकारली जात आहेत. त्यामुळे भारतीय एमएसएमई उत्पादकांना निर्यात वाढविण्यास आणि चांगला दर मिळविण्यास याचा मोठा फायदा होईल. पारदर्शकता वाढवणे, शाश्वततेकडे वाटचाल सुलभ करणे आणि जागतिक बाजारपेठेच्या निकषांनुसार स्वतःला सिद्ध करणे, हा या सहयोगाचा प्रमुख उद्देश आहे. सध्या ईपीडी अनिवार्य नसली तरी पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी जगभरातील सरकारे त्यावर भर देत आहेत. आगामी काळात हा आवश्यक निकष ठरणार आहे.”