दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयानुसार, वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून संसार बिघडवला असल्यास त्याच्याकडून नुकसानभरपाई मागता येऊ शकते.
एका प्रकरणात पत्नीने पतीच्या कथित प्रेयसीविरोधात ४ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करत याचिका दाखल केली होती. तिचा आरोप होता की पतीच्या प्रेयसीमुळे त्यांच्या वैवाहिक नात्यात तणाव निर्माण झाला आणि संसार उद्ध्वस्त झाला.
कायदेशीर पार्श्वभूमी
-
एलियनएशन ऑफ अफेक्शन (Alienation of Affection) या संकल्पनेनुसार तिसऱ्या व्यक्तीमुळे नातेसंबंध मोडले तर पीडित जोडीदार नुकसानभरपाई मागू शकतो.
-
हा कायदा अँग्लो-अमेरिकन कॉमन लॉमधून आलेला असला तरी भारतातील विवाह कायद्यात थेट तरतूद नाही.
-
न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी स्पष्ट केले की, हिंदू विवाह कायदा किंवा कौटुंबिक न्यायालयात तिसऱ्या पक्षाविरुद्ध कारवाई करता येत नसली, तरी सिव्हिल कोर्टात नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करता येतो.
प्रकरणाचा तपशील
-
पती-पत्नीने २०१२ मध्ये लग्न केले आणि २०१८ मध्ये त्यांना जुळी मुले झाली.
-
आरोपी प्रेयसी ही पतीच्या कंपनीत अॅनालिस्ट म्हणून काम करत असताना त्यांची जवळीक वाढली. विवाहित असल्याचे माहित असूनही तिने संबंध ठेवले, असा पत्नीचा आरोप.
-
२०२३ मध्ये पतीने छळाचा आरोप करून घटस्फोटासाठी अर्ज केला, त्यानंतर पत्नीने प्रेयसीविरोधात नुकसानभरपाईची मागणी केली.
न्यायालयाचे निरीक्षण
-
प्रेयसीच्या वकिलांनी हा समांतर खटला असल्याचे सांगत दावा फेटाळण्याची मागणी केली होती.
-
परंतु न्यायालयाने स्पष्ट केले की, नातं संपवणं किंवा बदलणं हा गुन्हा नसला तरी त्यातून झालेल्या हानीसाठी भरपाई मागता येते.
-
घटस्फोटाची केस आणि नुकसानभरपाईची केस या स्वतंत्र असून एकमेकांवर परिणाम करणार नाहीत.
या निर्णयामुळे वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीमुळे झालेल्या भावनिक नुकसानीसाठी सिव्हिल कोर्टात नुकसानभरपाई मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.