वडगाव शेरी बातमी : पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; शास्त्रीनगर चौक उड्डाणपुलाच्या कामापूर्वी नगर रस्त्यावरील पाहणी

येरवड्यातील शास्त्रीनगर चौक उड्डाणपुलाच्या कामाला या आठवड्यात सुरुवात होणार आहे. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगर रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.

या पाहणीत आमदार पठारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, येरवडा, विमानतळ आणि चंदननगर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव, तसेच स्थानिक माजी नगरसेवक ॲड. भैय्यासाहेब जाधव, किशोर विटकर व महेंद्र पठारे उपस्थित होते.

शास्त्रीनगर चौक हा कल्याणी नगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, नगर रस्ता आणि डॉन बॉस्को रस्ता या मार्गांचा संगम असल्याने नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास जाणवतो. केवळ १०० मीटर अंतरावर दोन सिग्नल असल्यामुळे समस्या अधिकच गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

नगरहून पुण्याकडे येताना शास्त्रीनगर चौकातून गोल्फ क्लब चौकाकडे जाणारे उजवे वळण बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक वाडीया बंगल्यासमोरून कर्णे पथावरून डॉन बॉस्को रस्त्यावर वळवली जाणार आहे. यासाठी शास्त्रीनगर चौकातील रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. खुळेवाडीतील नागरिकांना रस्ता ओलांडता यावा यासाठी बायपास चौकाजवळ यु-टर्नची सोय करण्यात येणार आहे. तसेच खराडी, रामवाडी, शास्त्रीनगर परिसरातील सर्विस रस्ते व पडीक जागा वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांचे मत

मनोज पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त):
“नगर रस्त्यावरील सिग्नल फ्री योजनेमुळे वाहतुकीचा वेग वाढला असून कोंडी कमी झाली आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चिन्हे आणि उपाययोजना सुरू आहेत. शास्त्रीनगर चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल अपरिहार्य आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.”

बापूसाहेब पठारे (आमदार, वडगाव शेरी):
“नगर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा चिन्हे, सूचनाफलक लावण्याचे काम सुरू झाले आहे. पादचाऱ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याने पाहिली जाईल.”

नगर रस्त्यावर होणाऱ्या प्रमुख उपाययोजना:
१. शास्त्रीनगर येथील वाहतूक कर्णे रस्त्यावरून वळवली जाणार.
२. पादचाऱ्यांसाठी सुरक्षा चिन्हे व सूचनाफलक उभारले जाणार.
३. नो-एन्ट्रीतून वाहन आणणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढवली जाणार.
४. यु-टर्न जागी लहान वाहतूक बेटे उभारली जाणार.
५. आपले घर सोसायटी व दर्गा परिसरातील सर्विस रस्ते वाहतुकीसाठी खुली होणार.
६. खुळेवाडीतील नागरिकांना यु-टर्नची सोय उपलब्ध होणार.