शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता ११वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील २१ लाखांहून अधिक क्षमतेपैकी आतापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांना आता पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे.
एकूण २१,५९,२३२ प्रवेश क्षमतेपैकी यावर्षी १४,८५,६८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३,४३,९६९ विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंदणी व पसंती सूची पूर्ण केली. सध्या १३,३३,८९३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र काही जागा रिक्त राहिल्याने ही अंतिम फेरी घेण्यात येत आहे.
ऑनलाईन प्रक्रिया २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. अल्पसंख्याक, व्यवस्थापन व इतर कोट्यांतील प्रवेशही याच कालावधीत होतील. तसेच विद्यार्थी २५ सप्टेंबरपर्यंत थेट महाविद्यालयात जाऊनही प्रवेश घेऊ शकतील.
प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी लॉग-इन करून माहिती तपासणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व निश्चित महाविद्यालयात जाऊन पडताळणी करून प्रवेश पूर्ण करणे गरजेचे आहे. एकदा प्रवेश घेतल्यास तो अंतिम राहील. वेळेत प्रवेश न घेतल्यास नंतर कोणतीही संधी मिळणार नाही, असे कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनीही पालक व विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे वेळेत पूर्ण करून महाविद्यालयात हजर राहावे, अन्यथा प्रवेशाची संधी गमवावी लागू शकते.”