प्रतिनिधी; मानस मते: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेलीतील घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा सिव्हिल लाईन्स परिसरात हा प्रकार घडला. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेनंतर सोशल मीडियावरून एक पोस्ट टाकून गँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीने या गोळीबाराची जबाबदारी घेतली असल्याचे सांगितले जात आहे. ही पोस्ट हिंदी भाषेत असून त्यामध्ये चित्रपटसृष्टीला उघड धमकी दिली आहे.
पोस्टमध्ये लिहिले आहे की, “बंधूंनो, आज सिव्हिल लाईन्स, बरेली येथे खुशबू पटानी आणि दिशा पटानी यांच्या घरावर झालेला गोळीबार आम्हीच केला आहे. कारण त्यांनी आमचे पूज्य संत प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचा अपमान केला आहे.” पुढे या पोस्टमध्ये असा इशाराही देण्यात आला आहे की, “हा फक्त एक ट्रेलर होता. पुन्हा कोणीही आपल्या धर्माचा किंवा देवी-देवतांचा अपमान केला, तर त्याला घरात कोणीही टिकवले जाणार नाही. हा संदेश फक्त दिशा पटानीसाठी नाही, तर संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांसाठी आहे.”
या पोस्टची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या बरेली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.