Pune Auto Driver Crime Case : पेठेत जायला रिक्षा केली, एक चूक आणि रिक्षावाल्यानं प्रवाशालाच संपवलं
पुणे : पुणे स्टेशनवरून रिक्षा करून निघालेल्या आशुतोष वैशंपायन (वय 47) यांचा प्रवास रक्तरंजित ठरला. ४ सप्टेंबर रोजी ते सुभाषनगरकडे निघाले होते; मात्र घरी पोहोचण्याआधीच त्यांना आपला जीव गमवावा लागला.
११ सप्टेंबर रोजी मुळशी तालुक्यातील घोटवडे गावाजवळ कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ मिळालेल्या कपड्यांवरून आणि आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता वैशंपायन यांनी पुणे स्टेशनवरून रिक्षा केली आणि नंतर एका बारजवळ ती रिक्षा सोडून दुसऱ्या रिक्षात बसल्याचे समोर आले. याच रिक्षाचालकानं त्यांची हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपी रिक्षाचालकाचे नाव सचिन जाधव (वय 41, रा. धनकवडे) असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी दरोड्याचे तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत. तपासात उघड झाले की, वैशंपायन दारूच्या नशेत होते. एटीएममधून पैसे काढताना सचिन जाधवच्या लक्षात आले की त्यांच्या जवळ मोठी रोकड व बॅलन्स आहे. पैसे लुटण्यासाठी त्याने वैशंपायन यांना सुभाषनगर ऐवजी घोटवडे येथे नेले व लोखंडी वस्तून वार करून त्यांचा गळा चिरला.
हत्यानंतर त्याने वैशंपायन यांचे डेबिट कार्ड वापरून तब्बल ₹४.४५ लाख काढले आणि त्यातील काही रक्कम ट्रकच्या हप्ते फेडण्यासाठी वापरली. पोलिसांनी पद्धतशीर सापळा रचून जाधवला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील रिक्षा प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.





