पुणे: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून चित्रपट आणि नाट्य संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वर्दीतील नवदुर्गा’ या उपक्रमांतर्गत पुणे शहरातील शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, फरासखाना, खडक, स्वारगेट, चंदननगर, येरवडा व विमाननगर या नऊ पोलीस ठाण्यांमधील कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सर्व महिला पोलिस अधिकाऱ्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटपही करण्यात आले.
या उपक्रमाला संस्थापक अध्यक्ष शुभम शशिकांत मोरे, सचिव अभिनेता चेतन दशरथ गिरी, बालगंधर्व टॅलेंट कट्टा अध्यक्ष निलेंद्र यादव, उपाध्यक्ष अभिनेता कुणाल देशमुख, संचालिका अभिनेत्री रश्मी बांदल, संचालिका अभिनेत्री अनुश्री ढम, आनंदी फाउंडेशनचे गणेश विटकर, सामाजिक कार्यकर्ते रोहित भिसे, दीपक भारती, रंगभूषाकार बालाजी गोरे, अनिल गायकवाड, सुधीर भालेराव, ओमकार जाधव, अनिकेत जगताप, मयूर कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
शुभम मोरे म्हणाले, “आपल्या समाजजीवनात पोलिसांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. २४ तास कर्तव्य बजावताना घरातील जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखणाऱ्या महिला पोलिस अधिकारी खऱ्या अर्थाने आधुनिक नवदुर्गा आहेत. त्यांच्या त्याग, धैर्य आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा उपक्रम गेली आठ वर्षे सातत्याने राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस दलातील महिलांना एक वेगळी ऊर्जा व प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा आहे.”