संयुक्त अरब अमिरातीमधील महाराष्ट्र संघटनांची सहयोगी विकासावर चर्चा

इंडियन पीपल्स फोरम (महाराष्ट्र कौन्सिल) च्या पुढाकाराने सुरु झालेल्या “संयुक्त महाराष्ट्र” च्या सदस्यांची पहिली त्रैमासिक बैठक नुकतीच दुबईतील करामा येथील हॉटेल पेशवा येथे आयोजित करण्यात आली होती.

“संयुक्त महाराष्ट्र” ही संकल्पना आयपीएफ महाराष्ट्र कौन्सिलचे प्रमुख, ज्येष्ठ उ‌द्योजक आणि सामाजिक सल्लागार /समाज मार्गदर्शक श्री राहुल तुळपुळे ह्यांची. ही संस्था युएईमध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यवसायाशी संबंधित मराठी संघटनांना एकाच छत्राखाली आणि एका सामायिक व्यासपीठाखाली एकत्र आणून युएईमधील मराठी समुदायाला बळकटी देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीमध्ये कार्यरत असलेल्या ३५ वेगवेगळ्या संस्था आणि गट संयुक्त महाराष्ट्र उपक्रमाचा भाग आहेत, ज्यात गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, महाराष्ट्र मंडळ अबू धाबी, महाराष्ट्र मंडळ दुबई अश्या काही नामांकित संस्था सुद्धा आहेत.

श्री रवींद्र चव्हाण ह्यांच्या हस्ते ह्या संकल्पनेचे उदघाटन वर्षाच्या सुरवातीला दुबई इथे झाले होते. ह्यातल्या कार्ययरात संस्था आज दुबई त राहणाऱ्या साधारण ४००,००० अनिवासी मराठी लोकांसाठी विविध कार्य क्षेत्रात काम करतात -घरगुती कामगारांसाठी आधार व्यवस्था, महिला गृहिणींचे सक्षमीकरण, मराठी लोकांना त्यांचे व्यवसाय सुरु करण्यास मदत करणे, इथल्या मुलांसाठी साप्ताहिक शाळा चालवणे, वाचन संस्कृती वाढवणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपणे, प्रादेशिक उत्सव साजरे करणे आणि इतर हि बरेच कार्य करत असतात.

बैठकीत चर्चा झालेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये इथल्या अनिवासी मुलांसाठी मराठी भाषेचा एकीकृत जागतिक असे अभ्यासक्रम विकसित करणे जे मुलांना महाविद्यालयीन क्रेडिटसाठी देखील पात्र ठरू शकेल. इथे होणाऱ्या विविध स्तरांवर स्थानिक सामुदायिक उपक्रम आयोजित करण्यासाठी एका समर्पित जागेची फार आवश्यकता आहे असे देखील सर्व संस्थांनी अधोरेखित केली. डिसेंबर २०२५ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या मराठी विश्व संमेलनासाठी युएईहून सर्वसमावेशक आणि सक्षम शिष्टमंडळ पाठवण्याबाबतहि चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाने द्वारे घोषित केल्याप्रमाणे ऑक्टोबरच्या आठवड्यात अभिजात भाषा साजरी करण्याच्या योजनांवरही चर्चा झाली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बाजारपेठेतील संधी, नियम, अनुपालन, सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणारी मार्गदर्शन पत्रिका करण्यासाठी यूएईमधील फळे आणि भाजीपाला व्यापारातील अनुभवी व्यावसायिकांचा एक कमोडिटी ट्रेडिंग टास्क फोर्स तयार करण्याचेही मान्य करण्यात आले. जेणे करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन यूएईला निर्यात करताना मदत होईल.

श्रीमती नीलम नांदेकर यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त महाराष्ट्र उपक्रम सर्व ३५ संस्थांना व्यापणाऱ्या कार्यक्रमांचे मासिक कॅलेंडर देखील प्रकाशित करतो ज्याचे सर्व गट प्रतिनिधींनी खूप कौतुक केले. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ-सहकार्याची ही भावना सर्व संस्थांना व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास आणि त्यांचे उपक्रम संपूर्ण मराठी समुदायासाठी अधिक अर्थपूर्ण आणि सुलभ बनवत आहे.