BIG NEWS : IND vs PAK : टीम इंडियाचा विजयाचा ‘चौकार’; पाकसमोर टीम इंडियाची ‘दादागिरी’

IND vs PAK : India beat Pakistan Asia Cup 2025 Super 4 : आशिया कपमधील सुपर फोर सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान आरामात पार केलं. अभिषेक शर्मानं 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी सलामीला मैदानात पाऊल टाकलं. दोघांनीही सुरुवातीला आक्रमक खेळ दाखवत तुफानी फटकेबाजी सुरू केली. पण हार्दिक पांड्याने फखरला परत पाठवलं. तो 9 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. यानंतर साहिबजादा फरहान आणि सईम अयूब यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला.

मात्र, शिवम दुबेनं सईम अयूबला (17 चेंडूत 21 धावा) बाद करत ही जोडी फोडली. पाकिस्तानचा दुसरा विकेट 93 धावांवर पडला. त्यानंतर पाकिस्तानला पटकन आणखी दोन धक्के बसले. हुसैन तलत फक्त 10 धावांवर कुलदीप यादवच्या फिरकीला बळी पडला.

साहिबजादा फरहानने तुफानी कामगिरी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र शिवम दुबेनं पुन्हा भारताला यश मिळवून दिलं. कर्णधार सूर्यकुमार यादवने झेल घेत फरहानला माघारी पाठवलं. फरहानने 45 चेंडूत 58 धावा ठोकल्या, त्यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर मोहम्मद नवाज 19 चेंडूत 19 धावा करून धावबाद झाला. शेवटी कर्णधार सलमान आगा आणि फहीम अशरफ यांनी केवळ 9 चेंडूत 22 धावांची भागीदारी करून पाकिस्तानचा डाव 172 धावांवर नेला.

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता. नवव्या षटकातच भारताने शतक गाठलं. अभिषेक शर्मानं फक्त 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण 10व्या षटकात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. शुभमन गिल 47 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही न उघडता 11व्या षटकात माघारी परतला.