खूपच दु:खदायक! पावसामुळे गोठ्यात उतरला विजेचा प्रवाह; सासू-सुनेचा मृत्यू, गाईचाही अंत, गावावर शोककळा

प्रतिनिधी | मानस मते: माळशिरस (जिल्हा सोलापूर)जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. अशाच एक अत्यंत दुर्दैवी आणि ह्रदयद्रावक घटनेत माळशिरस तालुक्यात महाळुंग येथील ढवळे वस्तीवर विजेचा करंट लागून सासू-सुनेचा मृत्यू झाला असून, एक गायही दगावली आहे.

या दुर्घटनेत सानिकाबाई विठ्ठल रेडे (वय ५७) आणि सुवर्णा अमोल रेडे (वय २७) या दोघींना आपला जीव गमवावा लागला.

घटना कशी घडली?

बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास रशिका रेडे या नेहमीप्रमाणे गाईच्या गोठ्याकडे गेल्या. त्यावेळी गोठ्यात एक गाय जमिनीवर पडलेली दिसली. तिला शॉक बसलेला होता. ही बाब लक्षात न घेता, सानिकाबाईंनी गाईला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर काही वेळातच सुवर्णा रेडे या गोठ्यात गेल्या आणि त्यांनाही विजेचा जोरदार झटका बसून त्यांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन महिलांचा आणि एका गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शॉर्टसर्किटची शक्यता

रात्रभर पडलेल्या पावसामुळे गोठ्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन विजेचा प्रवाह गोठ्यात उतरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.

ही घटना गावासाठीच नव्हे तर संपूर्ण भागासाठी एक शोकांतिकेची ठरली आहे.