पुण्यात धक्कादायक प्रकार ! पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कथित मारहाण व शिवीगाळ; चौकशीची मागणी

पुणे : कोथरूड परिसरातून एक गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका विवाहित पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेतल्याची आणि त्यांच्यावर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. संबंधित महिलांनी पोलिसांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमधील एका २३ वर्षीय विवाहित महिलेला पतीकडून होणाऱ्या अत्याचारांमुळे पुण्यात आश्रय घ्यावा लागला होता. पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं आणि स्वावलंबनासाठी कौशल्यविकास प्रशिक्षणाचीही मदत केली. मात्र, या महिलेचा नातेवाईक एक निवृत्त पोलिस अधिकारी असून, त्याने आपल्या ओळखीचा वापर करून पुणे पोलिसांकडून त्या महिलांची माहिती घेतली.

यानंतर कोणतीही कायदेशीर नोटीस, वॉरंट अथवा पूर्वसूचना न देता कोथरूड पोलिसांनी त्या तीन सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकून त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं. पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कथितरित्या मारहाण करण्यात आली आणि जातीय व अश्लील भाषेचा वापर करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.

गंभीर आरोप

महिलांनी केलेल्या आरोपानुसार, सहायक पोलिस निरीक्षक (API) प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी त्यांच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार केला. “तू महार-मांगाची आहेस का?”, “तू रांड आहेस”, “तू मुलांसोबत झोपतेस का?”, अशा अपमानास्पद व जातीवाचक शब्दांचा वापर करण्यात आला. महिलांना तब्बल पाच तास रिमांड रूममध्ये ठेवण्यात आलं आणि मोबाईल जप्त करून त्यांचे पासवर्ड बदलण्यात आले, असा गंभीर आरोप आहे.

पोलिसांनी तक्रार नोंद घेतली नाही

या प्रकारानंतर महिलांनी पोलीसांविरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास उलटल्यानंतरही तक्रार नोंदवली गेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर, वैद्यकीय तपासणीसाठीही परवानगी नाकारण्यात आली.

सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

या प्रकाराची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची मागणी केली आहे. “जर हे सर्व सत्य असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. गृहमंत्र्यांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” असं सुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांचं स्पष्टीकरण

दरम्यान, पुणे शहराचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांनी सांगितलं की, छत्रपती संभाजीनगर येथील एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी केवळ सहकार्य केलं. कोणत्याही महिलेस शिवीगाळ अथवा मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.