पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा दुसरा मार्ग आकाराला येण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. निगडी ते चाकण या ४०.२९६ किलोमीटर अंतराच्या आणि ३१ स्थानकांचा समावेश असलेल्या मार्गासाठी सुमारे १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मान्यता दिल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडे पाठविला जाईल. केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, हा मार्ग सुरू होण्यासाठी किमान सहा ते सात वर्षे लागतील.
दापोडी-निगडी मार्गानंतर ‘भक्ती-शक्ती चौक-चाकण’ हा नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. महामेट्रोकडून सादर केलेल्या डीपीआरमध्ये पिंपरी-चिंचवडमधील २५ आणि चाकण नगरपालिकेतील सहा अशी एकूण ३१ स्थानके प्रस्तावित आहेत. त्यातील ‘नाशिक फाटा- संत तुकारामनगर’ हा १.३३६ किमीचा टप्पा आधीच पूर्ण झाला आहे.
महापालिका या प्रकल्पासाठी १५,९०९.६५ चौ.मी. जागा (मूल्य ३३ कोटी रुपये) देणार आहे. तसेच राज्य शासनाची १,३४,८४१.८३ चौ.मी. जागा (मूल्य ७७ कोटी ८ लाख रुपये) आणि खासगी मालकीची १८,४७४.१८ चौ.मी. जागा (मूल्य ७२ कोटी २८ लाख रुपये) घेतली जाणार आहे.
निधी वाटप :
-
केंद्र शासन – १०%
-
राज्य शासन – १०%
-
पिंपरी-चिंचवड महापालिका – १५ ते २०%
-
उर्वरित ६०% निधी कर्जातून उभारला जाणार
महत्त्वाचे मुद्दे:
-
पिंपरी-चिंचवडमध्ये २५ मेट्रो स्थानके
-
चाकण नगरपालिकेत सहा स्थानके
-
एकूण अंतर : ४०.२९६ किमी
-
खर्च : ₹१०,३८३.८९ कोटी
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, निधीची उपलब्धता हा प्रकल्प पूर्ण करण्यातील मोठा घटक असून, वाहतूक व्यवस्थापन लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने काम केले जाईल. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली की, लवकरच महापालिका व महामेट्रो अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन डीपीआरवर चर्चा केली जाईल. राज्य व केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर कामाला गती दिली जाईल.