पुणे वाहतूक निर्णय : शनिवार-रविवारी अवजड वाहनांसाठी अटींसह मुभा, ‘हे’ वाहने मात्र अजूनही बंदीच्या यादीत

मानस मते, पुणे – शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहनांसाठी शनिवार आणि रविवारी वाहतुकीस सशर्त परवानगी देण्यात येणार आहे. विशेषतः बांधकामाशी संबंधित डंपर आणि रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर यांना ही मुभा मिळणार आहे. मात्र जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर आणि इतर धीम्या गतीने चालणाऱ्या किंवा सामान्य मालवाहू वाहनांवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम राहतील.

वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी हा तात्पुरता आदेश जारी केला असून, या बदलाची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरूपात केली जाणार आहे. यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक विभागाने बांधकाम व्यावसायिक आणि वाहनचालकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल.

🚛 वाहतुकीस परवानगी असलेल्या कालावधीत वेळापत्रक:

📅 शनिवार (२ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट) :

  • दुपारी ४ ते रात्री १० वगळता अवजड वाहनांना शहरात वाहतुकीस परवानगी.

📅 रविवार (३ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट) :

  • रेड झोन वगळता शहरात सर्वत्र पूर्ण वेळ वाहतुकीस मुभा.