विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परंतु जेव्हा कायद्याचे रक्षकच गुन्ह्याच्या वाटेला जातात, तेव्हा सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न उभा राहतो. अशाच एका प्रकरणात खराडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर (पीएसआय) हॉटेल चालकाला कारवाईची धमकी देत पैसे उकळल्याचा आरोप झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता घडली. पुण्यातील हॉटेल व रेस्टॉरंट्सना रात्री १.३० वाजेपर्यंत परवानगी असतानाही, संबंधित अधिकारी हॉटेलमध्ये गेले. त्यांनी तेथील एका ग्राहकाचा जेवतानाचा व्हिडिओ काढला आणि दुसऱ्या दिवशी हॉटेल चालकाला पोलीस ठाण्यात बोलावले.
यानंतर, “तुम्ही माझं काम करा, मी तुमचं करतो,” असे सांगत हॉटेल चालकाकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्यवहार त्याच दिवशी रात्री सुमारे ८.३० वाजता झाल्याचे समजते.
दरम्यान, खराडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले की, “हॉटेल-रेस्टॉरंटला रात्री १.३० वाजेपर्यंत परवानगी आहे. संबंधित अधिकारी मिकाची क्लबमध्ये सव्वा बारा वाजता गेले होते, परंतु आम्ही त्यांना हॉटेल बंद करण्याचे कोणतेही आदेश दिले नव्हते. या घटनेची माहिती घेतली जात आहे.”