मद्यप्रेमींसाठी एक नवी आणि फायदेशीर योजना सध्या चर्चेत आहे. आता दारू संपवल्यानंतर रिकाम्या बाटलीवर थेट ‘कॅशबॅक’ मिळणार आहे. केरळ राज्याने पर्यावरण रक्षणासाठी आणि प्लास्टिक कचऱ्याला आळा घालण्यासाठी ही अभिनव योजना आणली आहे.
नेमकी योजना काय आहे?
केरळ सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
-
800 रुपयांहून अधिक किमतीची प्रीमियम दारू आता फक्त काचेच्या बाटल्यांमध्येच विकली जाईल.
-
दारू खरेदी करताना ग्राहकांकडून 20 रुपये ‘डिपॉझिट’ स्वरूपात अतिरिक्त आकारले जातील. ग्राहकांनी रिकामी बाटली परत केली, की त्यांना हे 20 रुपये परत मिळतील.
बॉटलवर क्यूआर कोड असणार
या योजनेअंतर्गत प्रत्येक बाटलीवर क्यूआर कोड लावला जाईल, ज्याच्या मदतीने रिफंड प्रक्रिया ट्रॅक करता येईल. मात्र, रिकामी बाटली ज्या दुकानातून खरेदी केली गेली होती, त्याच ठिकाणी परत केल्यावरच रक्कम परत मिळणार आहे.
कोणत्या भागात अंमलबजावणी सुरू?
तिरुवनंतपूरम आणि कन्नूर या दोन ठिकाणी सध्या या योजनेची प्रायोगिक अंमलबजावणी केली जात आहे. सप्टेंबर 2025 पासून ही योजना राज्यभर राबवण्यात येणार आहे.
मद्याच्या बाटल्यांच्या स्वरूपात बदल
800 रुपयांखालील मद्य अजूनही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्येच विकले जाणार आहे. परंतु 800 रुपयांपेक्षा महाग दारू आता केवळ काचेच्या बाटल्यांत उपलब्ध असेल.
ही योजना केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर मद्यप्रेमींसाठीही थोडा आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे!