बारामती : बसमध्ये कोयत्याने हल्ला; जीव वाचवताना पडलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे ३१ जुलै रोजी बारामती-वालचंदनगर बसमध्ये घडलेल्या कोयता हल्ल्याच्या घटनेनंतर उपचार घेत असलेल्या वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) यांचे बुधवारी पुण्यात दुर्दैवी निधन झाले. हल्ल्यातून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. गेल्या पाच दिवसांपासून त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या आणि अखेर मृत्यूशी झुंज हरल्या.

त्या दिवशी वर्षा भोसले या आपल्या माहेरी, वालचंदनगर येथे जाण्यासाठी बसने प्रवास करत होत्या. दरम्यान, बसमधील मागच्या सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर (वय २१, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, बारामती) या तरुणाने अचानक पवन अनिल गायकवाड या शेजारील प्रवाशावर कोयत्याने वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे बसमधील वातावरणात एकच गोंधळ उडाला.

घाबरलेल्या प्रवाशांनी वाचण्यासाठी चालत्या बसमधून उड्या मारण्यास सुरुवात केली. पवन गायकवाड हा देखील पळत सुटला आणि त्याच्या मागे आरोपी सगर धावत गेला. वर्षा भोसले यांनीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या जमिनीवर जोरात पडल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले.

प्राथमिक उपचारासाठी त्यांना बारामती औद्योगिक वसाहतीतील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. नंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र सलग पाच दिवस मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

वर्षा भोसले या वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजचे प्रा. रामचंद्र भोसले यांच्या पत्नी होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.